अंकुर स्पोर्ट्स क्लब उपांत्यपूर्व फेरीत

अंकुर स्पोर्ट्स क्लब उपांत्यपूर्व फेरीत

केदारनाथ क्रीडा मंडळ, विजय बजरंग व्यायामशाळा या संघांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच जय भारत क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब यांनी आपापल्या गटात अग्रस्थान पटकावत थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली.

लालबागच्या सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या केदारनाथ क्रीडा मंडळाने पुण्याच्या महाराष्ट्र कबड्डी संघाला २२-२१ असे पराभूत केले. मध्यंतराला ८-११ अशा तीन गुणांनी पिछाडीवर असलेल्या केदारनाथने उत्तरार्धात दमदार पुनरागमन करत हा सामना जिंकला. ओमकार, निखिल कदमच्या चढाया आणि त्याला प्रकाश मोरे, विपुल चव्हाण यांच्या पकडीची भक्कम साथ यामुळे केदारनाथने हा सामना जिंकला.

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या सामन्यात विजय बजरंग व्यायामशाळेने अमर क्रीडा मंडळाचा २८-२६ असा पराभव करत आगेकूच केली. अमन साळवीच्या चढाया आणि संकेत सावंत, नितीन विचारे यांची भक्कम पकड यामुळे अमरने विश्रांतीला १७-७ अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र, उत्तरार्धात त्यांचा खेळ खालावला. तर विजय बजरंगच्या गणेश तुपे, आकाश निकम, गणेश हातकर यांनी अप्रतिम खेळ करत आपल्या संघाला हा सामना जिंकवून दिला.

त्याआधी ग गटातील साखळी सामन्यात शिवशक्तीने गोल्फादेवीला २५-२४ असे नमवले. मात्र, गुण फरकाच्या आधारावर दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली. रायगडचा जय बजरंग संघ या गटात बाद झाला. इ गटात केदारनाथ संघाने आधीच बाद फेरी गाठली होती. त्यामुळे बंड्या मारुती आणि विजय नवनाथ यांच्यातील एकच संघ बाद फेरी गाठू शकणार होता. त्यात अखेर बंड्या मारुतीने विजय नवनाथला ३५- २६ असे पराभूत करत बाद फेरीत प्रवेश केला.

First Published on: January 6, 2020 5:48 AM
Exit mobile version