हॉकी इंडियाकडून आणखी ७५ लाख!

हॉकी इंडियाकडून आणखी ७५ लाख!

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीची विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यांना खेळाडू, तसेच क्रीडा संघटनांकडून आर्थिक मदत मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हॉकी इंडियाने करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान सहायता निधीला २५ लाखांची मदत केली होती. शनिवारी त्यांनी आणखी ७५ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते पंतप्रधान सहायता निधीला एकूण १ कोटी रुपयांची देणगी देणार आहेत.

करोनाविरुद्ध लढ्यात आणखी ७५ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय हॉकी इंडियाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. “सध्याच्या खडतर काळात प्रत्येकाने पुढे येऊन भारत सरकारला साथ देणे गरजेचे आहे. करोनावर मात करण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. देशाने आम्हाला नेहमीच खूप पाठिंबा दिला आहे आणि यातूनच आम्हाला कोणत्याही आव्हानावर मात करण्याचे बळ मिळते. आता देशासाठी आणि नागरिकांसाठी शक्य आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले. भारतामध्ये आतापर्यंत ३००० हून अधिक करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

First Published on: April 5, 2020 2:49 AM
Exit mobile version