आशियाई बॅडमिंटन स्पर्धा

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा

सिंधू, सायनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारताच्या स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसेच पुरुषांमध्ये समीर वर्माने आपला चांगला खेळ सुरु ठेवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. समीरने या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत हाँगकाँगच्या एग का लॉन्ग अँगसचा २१-१२, २१-१९ असा सरळ गेममध्ये पराभव केला. मात्र, आता उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर दुसर्‍या सीडेड चीनच्या शी युक्वीचे कठीण आव्हान असणार आहे.

महिला एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणार्‍या सायना नेहवालने कोरियाच्या किम गा इयुनला २१-१३, २१-१३ असे पराभूत केले. या सामन्यात सायनाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला आणि तिने किमला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तिने हा सामना सहजपणे जिंकला.

आता तिचा उपांत्यपूर्व फेरीत तिसर्‍या सीडेड जपानच्या अकाने यामागूचीशी सामना होईल. दुसरी भारतीय खेळाडू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या चोईरुनिसावर २१-१५, २१-१९ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने या सामन्याचा पहिला गेम अगदी सहजपणे जिंकला. मात्र, दुसर्‍या गेममध्ये चोईरुनिसाने सिंधूला चांगली झुंज दिली. पण, सिंधूने योग्यवेळी आपला खेळ उंचावत हा गेम आणि सामना जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर बिनसीडेड चीनच्या काय यानयानचे आव्हान असणार आहे.

उत्कर्ष-करिष्मा जोडी पराभूत

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उत्कर्ष अरोरा आणि करिष्मा वाडकर या भारताच्या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा दुसर्‍या फेरीत इंडोनेशियाच्या हाफिज फैझल आणि ग्लोरिया विडजाजा या जोडीने १०-२१, १५-२१ असे पराभूत केले. भारताच्याच वेंकट गौरव प्रसाद आणि जुही देवांगन या जोडीचाही पराभव झाला.

First Published on: April 26, 2019 4:31 AM
Exit mobile version