‘दोहा’त रंगतील रात्री अशा !

‘दोहा’त रंगतील रात्री अशा !

doha

वाळवंटात अ‍ॅथलेटिक्स? हो. तुम्ही बरोब्बर वाचताय! अशक्य ते शक्य करून जगाला दाखवायची हौस असलेल्या ‘कतार’ या देशाने अनेक अशक्यप्राय विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. त्या यादीत, वाळवंटात अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती भरवून, सार्‍या जगाचं लक्ष्य स्वतःकडे वळवण्याचा त्यांचा ताजा प्रयत्न आहे.

एकाच स्टेडियममध्ये आशियाई पातळीवरच्या स्पर्धाशर्यतींचं यशस्वी संयोजन करून, अवघ्या पाच महिन्यांच्या काळात पुन्हा त्याच खलिफा स्टेडियममध्ये जागतिक पातळीवरच्या स्पर्धाशर्यतींचं यशस्वी आयोजन करून ‘कतार’ काय सिद्ध करू पाहत आहे? ‘कतार’ सिद्ध करू पाहत आहे आपली आयोजन कुशलता. स्पर्धाशर्यतींदरम्यानच्या काळात ‘कतार’ दाखवू पाहत आहे आपली श्रीमंती. वाळवंटातील स्टेडियममध्ये, उघड्यावरील गरम वातावरण, अजस्त्र, महाकाय वातानुकूलित यंत्रणांमुळे धावण्यायोग्य बनवण्याचा अट्टाहास. स्टेडियममध्ये आलिशान गॅलर्‍या बनवून, अवघ्या पाच महिन्यात स्टेडियमला पुन्हा नवा साज देवून, ‘कतार’ दडपण आणू पाहत आहे ‘कतार’वर बहिष्कार टाकण्याची भाषा करणार्‍या इतर आखाती देशांवर!

अवघ्या ४८ वर्षांपूर्वी इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवणार्‍या ‘कतार’ने मोठ्या हुशारीने राजकारणाचा डाव खेळत, बार्सिलोना (स्पेन) आणि युजीन (अमेरिका) या दोन शहरांच्या नावापुढे ‘दोहा’चं प्यादं पुढे करून, २०१४ साली मोनॅकोमध्येच बाजी मारली. तेव्हाच खरं तर पाच महिन्यांत दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाशर्यती एकाच स्टेडियममध्ये भरवण्याचा डाव रंगला! पहिला डाव हा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतीच्या निमित्ताने २१ ते २४ एप्रिल २०१९ दरम्यान रंगला. आता दुसरा डाव हा आणखीन जोरकसपणे जगाला दाखवण्याची जोरदार तयारी ‘कतार’ करत आहे.

बहारिन,मॉरिटानिया, येमेन, कोमोरॉस, सौदी अरब, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वाकडेपणाला न जुमानणार्‍या ‘कतार’ने ‘अस्पायर’ अकादमीसारख्या संस्था स्थापून, मुताझ बार्शीम (उंच उडी) आणि अश्रफ अल सैफी (हातोडाफेक) सारखे जागतिक दर्जाचे अ‍ॅथलिट्स घडवून, अ‍ॅथलेटिक्सविश्वातील आपला मान उंचावला. तेल आणि विशेषतः नैसर्गिक वायुसाठ्यांच्या जोरावर अतिश्रीमंत देशांत गणना होणार्‍या ‘कतार’ला सर्व बाजूंनी संपन्न असण्याचा नजराणा दाखवण्यासाठी नामी संधी चालून आली आहे.

अ‍ॅथलेटिक्सविश्वातील जवळपास २१० देशांपैकी अवघ्या १०१ देशांनी आजवरच्या १६ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतीत पदके मिळवली आहेत. परंतु, त्या १०१ देशात अवघ्या दोनच आखाती देशांनी पदके मिळवली आहेत. ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य मिळवणार्‍या ‘कतार’ने एकूण पदकतालिकांत ४४वा क्रमांक मिळवीत, ५७ देशांना आपल्यामागे ठेवलयं! तरीसुद्धा ६ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य मिळवणार्‍या बहारीनने एकूण पदकतालिकांत २८ वा क्रमांक मिळवून आपल्यापुढे बरीच मजल मारल्याचा सुप्त राग ‘कतार’ला आहेच!

‘कतार’ची खरी ताकद तर वेगळीच आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत अ‍ॅथलेटिक्सचा हंगाम संपला असतानासुद्धा स्पर्धाशर्यती भरवण्याचा डाव, जगभरच्या अ‍ॅथलेटिक्स संघटनांच्या नाकावर टिच्चून, स्वतःच्या बाजूने, स्वतःच्या सोयीने करवून घेणार्‍या ‘कतार’ने खेळाचा डाव ‘दोहा’त रंगवायचा ठरवलं आहे. अ‍ॅथलेटिक्सचे रंग भरणार्‍या खलिफा स्टेडियममध्ये ४६,००० प्रेक्षकांची सोय आहे, तर फिफा वर्ल्डकपच्या निमित्ताने तयार होणार्‍या अतिभव्य ‘लुसेल’ स्टेडियममध्ये ८०,००० प्रेक्षकांची सोय करण्याचा ‘कतारी’ मानस आहे. २६ लाख लोकसंख्येतील ८० टक्के लोक हे राजधानी ‘दोहा’मध्येच राहत असल्याने खलिफा स्टेडियम गाजतं ठेवण्याचे आणि ‘लुसेल’ स्टेडियमचं बाह्य स्वरूप जगासमोर नेण्याची आलेली आयती संधी संयोजन समितीचे प्रमुख दाहलन अल ह्मद सोडतील असं वाटत नाही.

आशियाई पातळीवरच्या स्पर्धाशर्यतींत दिवस आणि रात्र अ‍ॅथलिट्सना धावडवणार्‍या कतारी अ‍ॅथलेटिक्स समितीने जागतिक स्पर्धाशर्यतींच्यासाठी मात्र केवळ रात्रीचाच कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे किमान तापमानात भल्यामोठ्या वातानुकूलित यंत्रणांच्या सहाय्याने भर वाळवंटात उत्कृष्ट वातावरणांत स्पर्धाशर्यती पार पाडायचा चंग बांधणार्‍या कतारी नजरेचा वेध काही औरच असावा! उगाच नाही त्यांनी ‘फलह’ हा बहिरी ससाणा जो अलगद भक्ष्य टिपतो आणि ज्याच्या दरार्‍याला सगळे वचकून असतात, तो पक्षी स्पर्धाशर्यतींचं बोधचिन्ह म्हणून वापरलाय ते! त्यामुळे यापुढील ९ दिवस (आजचा दिवस धरून एकूण दहा) चंदेरी लखलखाटात ‘दोहा’मधील रात्री कशा रंगतील ते पाहायला अ‍ॅथलेटिक्स क्रीडाशौकिनांना फार मजा येणार आहे हे वेगळं सांगायला नको!

– उदय ठाकूरदेसाई

First Published on: September 27, 2019 5:35 AM
Exit mobile version