ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील खेळ निराशाजनक

ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील खेळ निराशाजनक

कर्णधार फिंचचे विधान

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात पराभूत झाल्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामना गमावण्याची ही ऑस्ट्रेलियाची पहिलीच वेळ होती. मागील एक-दीड वर्षांत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बर्‍याच चढ-उतारांतून गेले आहे. मागील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील बॉल टॅम्परिंग प्रकरणात सहभाग असल्यामुळे स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. त्यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाने सलग सहा एकदिवसीय मालिका गमावल्या.

मात्र, आपल्या खेळात सुधारणा करत विश्वचषकाआधीच्या दोन मालिका त्यांनी जिंकल्या. त्यातच विश्वचषकासाठी स्मिथ आणि वॉर्नरचे पुनरागमन झाल्यामुळे त्यांचा संघ पुन्हा मजबूत झाला. त्यांनी या स्पर्धेतील ९ पैकी ७ साखळी सामने जिंकले, पण उपांत्य फेरीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीत आम्ही केलेला खेळ फारच निराशाजनक होता, असे त्यांचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच म्हणाला.

१२ महिन्यांपूर्वीचा आमचा संघ आणि आताचा संघ यात बराच फरक आहे. आमच्या संघाने मागील काही काळात खूप प्रगती केली आहे. सर्व खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीचा मला अभिमान आहे. मात्र, या सामन्यात आम्ही चांगला खेळ करू शकलो नाही. आमचे उपांत्य फेरीचा सामना जिंकत पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याची संधी निर्माण करण्याचे लक्ष्य होते.

परंतु, आम्हाला तसे करण्यात अपयश आले याचे दुःख आहे. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर आमचा या सामन्यातील खेळ फारच निराशाजनक होता. मात्र, इंग्लंडने हा सामना जिंकला याचे श्रेय त्यांच्या गोलंदाजांनाही दिले पाहिजे. क्रिस वोक्स हा उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि तो नेहमीच योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतो. जोफ्रा आर्चर प्रत्येक सामन्यागणिक आपल्या खेळात सुधारणा करत आहे. त्यामुळे त्यांनी हा सामना जिंकला याचे आश्चर्य वाटायला नको, असे फिंचने सांगितले.

First Published on: July 13, 2019 4:59 AM
Exit mobile version