बांगलादेशी क्रिकेटपटूंचा संप मागे!

बांगलादेशी क्रिकेटपटूंचा संप मागे!

bangladesh

बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी बुधवारी आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी स्थानिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंच्या मानधनात वाढ यासह एकूण आकरा मागण्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे (बीसीबी) केल्या होत्या. बीसीबीने यापैकी बर्‍याचशा मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बांगलादेशी क्रिकेटपटूंनी आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आमच्यातील चर्चा यशस्वी झाली. बीसीबीचे अध्यक्ष व संचालकांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमचे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू शनिवारपासून पुन्हा सामने खेळण्यास सुरुवात करतील. तसेच राष्ट्रीय संघाचे खेळाडू २५ ऑक्टोबरपासून (भारत दौर्‍यासाठीच्या) सराव शिबिरात सहभागी होतील, अशी माहिती बांगलादेशच्या कसोटी आणि टी-२० संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने दिली. तसेच बीसीबीचे अध्यक्ष याबाबत म्हणाले, आम्ही क्रिकेटपटूंच्या दोन मागण्या वगळता, नऊ मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

भारत दौरा होणार!
बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी मागील सोमवारी बीसीबीसमोर अकरा मागण्या ठेवत संप पुकारला होता. बांगलादेशच्या जवळपास ५० क्रिकेटपटूंनी संप पुकारल्यामुळे त्यांच्या आगामी भारत दौर्‍यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, आता क्रिकेटपटूंनी संप मागे घेतल्याने बांगलादेशचा संघ भारताच्या दौर्‍यावर येणार हे निश्चित झाले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-२०, तसेच दोन कसोटी सामने होणार आहेत. या दौर्‍यातील पहिला टी-२० सामना ३ नोव्हेंबरला दिल्ली येथे होणार आहे.

First Published on: October 25, 2019 5:02 AM
Exit mobile version