कोहली सर्वोत्तम!

कोहली सर्वोत्तम!

विराट कोहली

विराट कोहली हा कदाचित एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने भारतीय कर्णधाराची स्तुती केली. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसर्‍या आणि निर्णायक सामन्यात ९१ चेंडूत ८९ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्याने शतकवीर रोहित शर्मासोबत दुसर्‍या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे सामन्यानंतर फिंचने कोहली आणि रोहितचे कौतुक केले.

भारताकडे विराट आणि रोहित हे दोन उत्कृष्ट फलंदाज आहे. विराट कदाचित एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज आहे, तर रोहित सर्वोत्तम पाच फलंदाजांपैकी एक आहे. मोठ्या सामन्यांमध्ये संघाला गरज असताना भारताचे अनुभवी फलंदाज महत्त्वपूर्ण योगदान देतात. रोहितने निर्णायक सामन्यात शतक केले. शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्यात फलंदाजी करु शकला नाही. मात्र, रोहित आणि विराटने आपला खेळ उंचावत भारताला विजय मिळवून दिला. यावरूनच भारताची आघाडीची फळी किती मजबूत आहे, हे दिसते, असे फिंच म्हणाला. सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोहलीने आतापर्यंत ४३ एकदिवसीय शतके झळकावली आहेत.

विराट अव्वल स्थानी कायम

विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकावीराचा पुरस्कार मिळवणार्‍या कोहलीच्या खात्यात सध्या ८८६ गुण आहेत. त्याचा सहकारी रोहित शर्मा ८६८ गुणांसह दुसर्‍या स्थानी कायम आहे. डावखुरा सलामीवीर शिखर धवनला सात स्थानांची बढती मिळाली असून तो १५ व्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह (७६४ गुण) अव्वल स्थानावर असून त्याच्यात आणि दुसर्‍या स्थानी असणार्‍या ट्रेंट बोल्टमध्ये २७ गुणांचा फरक आहे.

First Published on: January 21, 2020 5:27 AM
Exit mobile version