Book Review : विराटमय पर्वाचा वेध!

Book Review : विराटमय पर्वाचा वेध!

'विराट' पुस्तक परीक्षण

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न ज्याला ‘जागतिक क्रिकेटचा सुपरस्टार’ म्हणून संबोधतो, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ज्याला ‘युवा खेळाडूंचा आयडॉल’ म्हणतो, तो म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला विराट कोहली. विराट आता क्रिकेटच्या मैदानावर असंख्य विक्रम करत असतानाच मैदानाबाहेरही तितकाच यशस्वी ठरत आहे. जगात तो लोकप्रियतेच्या बाबतीत क्रिस्तिआनो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांसारख्या नामवंत फुटबॉलपटूंच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहे. तसेच त्याच्या फिटनेसची तुलनाही या खेळाडूंसोबत केली जाते. मात्र, हे यश मिळवण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत, त्याने केलेले त्याग, हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. पूर्वीचा विराट आणि आताच विराट यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. लेखक विनायक राणे यांनी त्यांच्या ‘विराट’ या पुस्तकात वाल्याचा वाल्मिकी होण्याचा हा प्रवास खूप छान पद्धतीने मांडला आहे.

वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले त्याच दिवशी विराटने कर्नाटकाविरुद्ध रणजी सामन्यात ९० धावांची खेळी केल्याचे प्रत्येकच भारतीय चाहत्याला माहित आहे. मात्र, त्याने तसे का केले आणि विराट क्रिकेटपटू बनण्यात वडिलांचा किती मोठा वाटा होता, हे आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. विकासपुरी, पश्चिम दिल्ली या दिल्लीच्या वेशीवर असलेल्या भागात विराटचा जन्म झाला. विकासपुरी आणि यासारख्या ‘आऊटर दिल्लीवाल्या’ भागांनी भारतीय क्रिकेटला विरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा, ईशांत शर्मा आणि विराटसारखे हिरे दिले. विराटचे वडील प्रेम कोहली हे व्यावसायिक होते. मात्र, क्रिकेटची त्यांना आवड. त्यामुळे प्रेम आणि विराट ही बाप-लेकाची जोडी टीव्हीसमोर बसून तासंतास क्रिकेटचे सामने पाहायची. प्रेम कोहली यांनी अगदी ठरवून विराट आणि त्याचा मोठा भाऊ विकास यांना क्रिकेट प्रशिक्षणासाठी पाठवले. वडिलांचे क्रिकेटप्रेम विराट जाणत होता आणि त्याने एखादा सामना अर्धवट सोडणे त्याच्या पप्पांना आवडले नसते हे विराटला ठाऊक होते. त्यामुळेच तो वडिलांचे निधन झाले त्या दिवशीही मन घट्ट करून मैदानात उतरला.

वडिलांनी विराटाचे नाव ज्या ‘वेस्ट दिल्ली क्रिकेट अ‍ॅकॅडमी’त नोंदवले होते, तिथे त्याला रणजीमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केलेले माजी ऑफस्पिनर राजकुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. विराट आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. मात्र, त्याच्या या यशात शर्मा सरांचा मोठा वाटा असल्याचे विराट आजही विसरलेला नाही. २०१४ मध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने विराटने सरांना भेट म्हणून गाडी दिली. विराट खेळाडू म्हणून किती उत्कृष्ट आणि यशस्वी आहे हे सर्वांना माहित आहेच. मात्र, बाहेरून आक्रमक, कधीतरी उद्धट वाटणारा विराट हा माणूस म्हणून कसा आहे हे लेखकाने या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हीच या पुस्तकाची जमेची बाजू म्हणता येईल.

दिल्लीचे विविध वयोगटातील संघ, रणजी संघ, भारताचा १९ वर्षांखालील संघ, भारत ‘अ’ आणि भारताचा सिनियर म्हणजेच प्रमुख संघ या पायऱ्या विराटने अगदी झटपट पार केल्या. त्याला या दरम्यान खूप यश मिळाले आणि थोडे अपयशही सहन करावे लागले. मात्र, विराटला २०१४ इंग्लंड दौऱ्यातील अपयशाने हादरवून सोडले होते. तो त्यावेळी निराशेच्या गर्तेत जात होता आणि त्याला कोणाची तरी साथ गरजेची होती. ती साथ त्याला दिली भावी पत्नी अनुष्का शर्माने. अनुष्काच्या येण्याने विराटच्या आयुष्यात कसा बदल घडला आहे, पूर्वी आपल्या आक्रमतेसाठी ओळखला जाणारा विराट आता कसा शांत, संयमी झाला आहे याचे दर्शन ‘विराट’ या पुस्तकातून घडते. या दोघांवर बरीच टीकाही झाली. मात्र, त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही आणि आज ते ‘आयडियल कपल’ म्हणून ओळखले जातात.

त्याचप्रमाणे विराटने त्याच्या खेळावर आणि खासकरून फिटनेसवर घेतलेली मेहनत, त्याने भारतीय क्रिकेटला पटवून दिलेले फिटनेस आणि क्षेत्ररक्षणाचे मूलमंत्र, याचीही अनेक उदाहरणे या पुस्तकात देण्यात आली आहेत. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंच्या विराटबद्दलच्या भावना, इतकेच काय तर सपोर्ट स्टाफसोबत असलेले विराटचे नाते याचाही लेखकाने आवर्जून उल्लेख केला आहे. विराटच्या कारकिर्दीतील आकडे, त्याच्या कामगिरीचीही या पुस्तकात नोंद आहे. एकूणच विराटचा सामान्यत्वापासून सुरु होऊन असामान्यत्वाकडे होत गेलेला प्रवास अतिशय रंजकतेने, साध्या सोप्या-भाषेत या पुस्तकात आपण अनुभवतो. त्यामुळे अक्षर प्रकाशनने प्रकाशित केलेले ‘विराट’ हे पुस्तक विराटच्या आणि क्रिकेटच्या चाहत्यांना नक्कीच वाचले पाहिजे.


पुस्तकाचे नाव – विराट
लेखक – विनायक राणे
प्रकाशन – अक्षर प्रकाशन
मूल्य – रु. १७५/-


 

First Published on: March 22, 2021 5:00 AM
Exit mobile version