जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाज वारंवार घडत नाहीत – बिशप

जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाज वारंवार घडत नाहीत – बिशप

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाज वारंवार घडत नाहीत. त्यामुळे भारतीय संघाने त्याची योग्य काळजी घेण्याची गरज आहे, असे मत वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज इयन बिशप यांनी व्यक्त केले. बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे (अॅक्शन) बुमराह केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच चांगली कामगिरी करु शकेल असे म्हटले जायचे. परंतु, त्याने केवळ १४ कसोटीत ६८ गडी बाद करत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. त्यामुळेच बिशप यांनी बुमराहचे कौतुक केले.

पुरेशी विश्रांती दिली पाहिजे

बुमराहसारखे गोलंदाज वारंवार घडत नाहीत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत तितकेच यशस्वी होतात असे जागतिक क्रिकेटमध्ये फार कमी गोलंदाज आहेत. बुमराह हा या खास गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र, तो क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातील प्रत्येक सामना खेळू शकत नाही. तसे केल्यास त्याची कारकीर्द लवकर संपुष्टात येईल. मानवी शरीर इतका ताण सहन करु शकत नाही. त्यामुळे भारतीय संघाने बुमराहची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्याला पुरेशी विश्रांती दिली पाहिजे. त्याच्यासारखा गोलंदाज भारताला पुन्हा लवकर मिळू शकणार नाही, असे बिशप म्हणाले.

दमदार कामगिरी

बुमराहने आतपर्यंत १४ कसोटीत ६८ बळी, ६४ एकदिवसीय सामन्यांत १०४ बळी आणि ५० टी-२० सामन्यांत ५९ बळी घेतले आहेत. तसेच वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटीच्या एका डावात पाच गडी बाद करणारा तो आशियातील एकमेव गोलंदाज आहे.

First Published on: July 5, 2020 1:30 AM
Exit mobile version