जगातील सर्वोत्तम गोलंदाज

जगातील सर्वोत्तम गोलंदाज

Jasprit Bumrah

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागील काही काळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे तो जागतिक एकदिवसीय क्रमवारीत सध्या अव्वल स्थानी आहे. बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात विश्वचषकात पदार्पण करत हाशिम आमला आणि क्विंटन डी कॉक या सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने बुमराहची स्तुती केली. तो सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे कोहली म्हणाला.

बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. एखाद्या गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहणे ही एक गोष्ट असते. मात्र, त्याने टाकलेल्या चेंडूवर जेव्हा फलंदाजाच्या बॅटच्या किनार्‍याला लागलेला चेंडू तुम्ही स्लिपमध्ये पकडता, तेव्हा त्या गोलंदाजांचा वेग किती असेल हे तुम्हाला कळते. मी डी कॉकचा झेल पकडला आणि पुढील १५ मिनिटे माझ्या हातांना ते जाणवत राहिले. तो इतक्या वेगाने गोलंदाजी करतो आहे. त्यामुळे फलंदाजाकडे चेंडू खेळण्यासाठी फार वेळ नसतो. तसेच तो सतत योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत राहतो. त्यामुळे फलंदाजांच्या अडचणी अधिकच वाढतात. अखेरच्या षटकांमध्ये तो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो, पण कधीतरी तो चेंडू योग्य जागी पडला नाही तर गोष्ट वेगळी. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतो. कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजाला बाद करण्याचा त्याला विश्वास आहे. त्याच्यासमोर फलंदाज इतक्या अडचणीत सापडतात, हे पाहून कर्णधार म्हणून मला फार बरे वाटते, असे कोहली म्हणाला.

तसेच द.आफ्रिकेच्या हाशिम आमलानेही बुमराहचे कौतुक केले. माझ्यामते बुमराह आणि कागिसो रबाडा हे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. ते दोघे चांगल्या वेगाने गोलंदाजी करतातच, पण ते अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ते सामन्याच्या कोणत्याही क्षणी यॉर्कर टाकू शकतात, असे आमलाने सांगितले.

First Published on: June 8, 2019 5:30 AM
Exit mobile version