सूर्यकुमारचे शतक!

सूर्यकुमारचे शतक!

सूर्यकुमार

सूर्यकुमार यादवने केलेल्या आक्रमक शतकामुळे सौराष्ट्रविरुद्ध रणजी सामन्याच्या दुसर्‍या डावात मुंबईने दमदार पुनरागमन केले. मुंबईचा पहिला डाव २६२ धावांत आटोपला, ज्याचे उत्तर देताना सौराष्ट्रने ३३५ धावा करत पहिल्या डावात ७३ धावांची आघाडी मिळवली. मात्र, सूर्यकुमारच्या शतकामुळे मुंबईची तिसर्‍या दिवसअखेर दुसर्‍या डावात ३ बाद २८५ अशी धावसंख्या होती आणि त्यांच्याकडे २१२ धावांची आघाडी होती.

मुंबईच्या दुसर्‍या डावात युवा सलामीवीर भूपेन लालवानीला अवघ्या ३ धावांवर कुशांग पटेलने माघारी पाठवले. परंतु, सूर्यकुमार आणि जय बिस्ता यांनी मुंबईचा डाव सावरला. चहापानाला मुंबईची १ बाद १२० अशी धावसंख्या होती आणि त्यांच्याकडे ४७ धावांची आघाडी होती. यानंतर पार्थ भूतने बिस्ताला ४६ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. बिस्ता आणि सूर्यकुमारने दुसर्‍या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी रचली.

सूर्यकुमारने मात्र आक्रमक शैलीत खेळ सुरु ठेवत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले १४ वे आणि यंदाच्या रणजी मोसमातील दुसरे शतक झळकावले. त्याला शम्स मुलानीची उत्तम साथ लाभली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी ९८ धावा जोडल्यावर डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंह जाडेजाने त्याला पायचीत पकडले. सूर्यकुमारने १३० चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३४ धावांची खेळी केली. पुढे मुलानी (नाबाद ६७) आणि फॉर्मात असलेला सूर्यकुमार (नाबाद २५) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे दिवसअखेर मुंबईची ३ बाद २८५ अशी धावसंख्या होती.

त्याआधी तिसर्‍या दिवशी ६ बाद २५७ वरुन पुढे खेळणार्‍या सौराष्ट्रचा पहिला डाव ३३५ धावांवर संपुष्टात आला. चिराग जानीने (नाबाद ८४) तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत सौराष्ट्रला ७३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

संक्षिप्त धावफलक – मुंबई : २६२ आणि ३ बाद २८५ (सूर्यकुमार १३४, मुलानी नाबाद ६७, बिस्ता ४६) वि. सौराष्ट्र : पहिला डाव सर्वबाद ३३५ (जॅक्सन ८५, जानी नाबाद ८४; डायस ४/६४).

First Published on: February 7, 2020 5:25 AM
Exit mobile version