IND vs NZ Test series : खराब प्रदर्शनानंतर देखील रहाणेला, सचिन आणि कपिल देव यांना मागे टाकण्याची संधी

IND vs NZ Test series : खराब प्रदर्शनानंतर देखील रहाणेला, सचिन आणि कपिल देव यांना मागे टाकण्याची संधी

भारत आणि न्यूझीलंडमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. २५ नोव्हेंबर म्हणजेच गुरूवार पासून या मालिकेची सुरूवात होईल. यापूर्वी नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने शानदारी कामगिरी करून ३-० च्या फरकाने मालिकेवर कब्जा केला. टी-२० मालिका रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळवली गेली होती पण तो कसोटी मालिकेत संघाचा हिस्सा नसणार आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. रोहित सोबतच पहिल्या सामन्यात विराट कोहली देखील नसणार आहे. तसेच ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हिस्सा असणार आहे. जूनमध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

दरम्यान अजिंक्य रहाणेने आतापर्यंत ५ कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. ५ सामन्यांमधील एकही सामन्यात पराभव झाला नाही. ४ सामन्यांत संघाला विजय मिळाला तर १ सामना बरोबरीचा झाला. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्यात रहाणेची महत्त्वाची भूमिका राहिली होती. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने २ कसोटी सामने जिंकले होते. लक्षणीय बाब म्हणजे न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयी झाला तर, रहाणेच्या कर्णधारपदातील हा पाचवा विजय असेल. सोबतच सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांसारख्या दिग्गज खेळांडूना रहाणे मागे टाकेल. मात्र तो फलंदाजीच्या बाबतीत सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. कपिल देव आणि सचिन तेंडुलकर दोघांनाही कर्णधार असताना अनुक्रमे ४-४ सामन्यात विजय मिळवला होता. कपिल देव यांनी ३४ तर सचिनने २५ कसोटी सामन्यात कर्णधार पद सांभाळले होते.

भारतीय संघाकडून विराट कोहली सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत ६५ सामन्यांत नेतृत्व केले आहे यामधील ३८ सामन्यांत संघाला विजय मिळाला आहे तर १६ सामन्यांत पराभव झाले असून ११ सामने बरोबरीचे ठरले आहेत. तर एम.एस धोनी २७ सामन्यांतील विजयासह दुसऱ्या तर सौरव गांगुली २१ सामन्यांतील विजयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याव्यतिरिक्त कोणत्याच कर्णधाराला २० हून जास्त सामन्यात विजय मिळवता आला नाही.

न्यूझीलंडच्या संघाने भारतात आतापर्यंत एकूण ३४ कसोटी सामने खेळले आहेत. ३४ सामन्यांमधील न्यूझीलंडच्या संघाला फक्त २ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर १६ सामन्यात पराभव आणि १६ सामने बरोबरीचे ठरले आहेत. अशातच येणारी मालिका न्यूझीलंडच्या संघासाठी साहजिकच सोपी नसणार आहे कारण १९८८ नंतर न्यूझीलंडच्या संघाला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आला नाही.


हे ही वाचा: PV Sindhu : पी.व्ही सिंधू लढणार निवडणूक; जाणून घ्या कोणत्या पदासाठी असणार मैदानात


 

First Published on: November 23, 2021 4:29 PM
Exit mobile version