सचिन तेंडुलकरला कारकिर्दीतील १०-१२ वर्षे करावा लागला एका समस्येचा सामना!

सचिन तेंडुलकरला कारकिर्दीतील १०-१२ वर्षे करावा लागला एका समस्येचा सामना!

सचिन तेंडुलकरला कारकिर्दीतील १०-१२ वर्षे करावा लागला एका समस्येचा सामना

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके असे असंख्य विक्रम सचिनच्या नावे आहेत. त्याने तब्बल २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तो भारतीय क्रिकेटचा चेहरा होता. त्यामुळे चाहत्यांच्या सचिनकडून खूप अपेक्षा होत्या. सचिननेही या अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु, त्याच्यासाठी हे सोपे नव्हते. कारकिर्दीतील १०-१२ वर्षे त्याला मानसिक तणाव, चिंताग्रस्ततेचा सामना करावा लागला. त्याला बरेचदा झोपणेही अवघड झाले होते. सचिनने मानसिक आरोग्याचे महत्व पटवून देताना आपल्याबाबतचा अनुभव सांगितला.

झोपणेही अवघड झाले होते

सामन्यासाठी शारीरिकदृष्ट्या तयार होताना मानसिकदृष्ट्या तयार होणेही गरजेचे आहे, हे मला अनेक वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर लक्षात आले. माझ्या डोक्यामध्ये मैदानात उतरण्याच्या बऱ्याच आधीपासून सामना सुरु झालेला असायचा. मला खूप तणाव जाणवायचा. कारकिर्दीतील १०-१२ वर्षे मी चिंताग्रस्ततेचा सामना केला आणि अनेकदा सामन्याच्या आदल्या रात्री मला झोपणेही अवघड झाले होते, असे सचिनने एका चर्चासत्रात सांगितले.

परिस्थितीशी जुळवून घेतले

या तणावाचा सुरुवातीला मला त्रास झाला, पण नंतर मी तो माझ्या सामन्याच्या तयारीचा भाग असल्याचे स्वीकारले. तसेच मला सामन्यापूर्वी बरेचदा झोप येणार नाही हेसुद्धा मी स्वीकारण्याचा प्रयत्न केला. मी परिस्थितीशी जुळवून घेतले आणि माझे मन कशात तरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो, असेही सचिन म्हणाला. फलंदाजीचा सराव करणे, टीव्ही पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे किंवा सकाळी उठून चहा बनवणे, या छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण कमी करण्यासाठी आणि सामन्याची तयारी करण्यासाठी मदत झाल्याचे सचिनने सांगितले.

First Published on: May 17, 2021 3:47 PM
Exit mobile version