रोनाल्डो अजून २० वर्षाचा, वैद्यकीय चाचणीत झाले सिद्ध

रोनाल्डो अजून २० वर्षाचा, वैद्यकीय चाचणीत झाले सिद्ध

ख्रिस्तियानो रोनाल्डो

फिफा विश्वचषकानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने आता जुवेंटस फुटबॉल क्लबमध्ये सहभाग घेतला आहे. या फुटबॉल क्लबमध्ये प्रत्येक खेळाडुची फिटनेस टेस्ट (आरोग्य चाचणी) घेतली जाते. त्याचप्रमाणे त्यांनी रोनाल्डोचीदेखील फिटनेस टेस्ट घेतली. या टेस्टमध्ये रोनाल्डो उत्तीर्ण झालाच. परंतु पोर्तुगाल फुटबॉल संघाच्या या कर्णधाराने त्याचा फिटनेस सर्वोत्कृष्ट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याच्या फिटनेस टेस्टमध्ये हे सिद्ध झाले आहे की, रोनाल्डो जरी आत्ता ३३ वर्षांचा असला तरी त्याचा फिटनेस मात्र २० वर्षाच्या तरुणाइतका चांगला आहे. त्यामुळे रोनाल्डोला मैदानात रोखणे भल्याभल्यांना शक्य होत नाही. सामान्य लोक, फुटबॉल चाहते,समीक्षक,टिकाकार सध्या रोनाल्डोला निवृत्तीचा सल्ला देत आहेत. अशा वेळी रोनाल्डोने तो आत्तादेखील फिट असल्याचे सिद्ध केले आहे. त्याचा अप्रतिम फिटनेस दाखवून त्याने टिकाकारांचे तोंड बंद केले आहे.

रोनाल्डोच्या शरीरात फक्त ७ टक्के फॅट

मेडिकल टेस्ट रिपोर्टनुसार रोनाल्डोच्या शरीरात केवळ ७ टक्के फॅट (चरबी) आहे. त्याचबरोबर त्याच्या शरीरात तब्बल ५० टक्के मस्सल्स (मांस) आहेत. आरोग्य चाचणीत त्याला मस्क्युलर मॅन म्हटले आहे. त्यासोबतच रोनाल्डो तब्बल ३३.९८ किलोमीट प्रति तास इतक्या वेगाने धावू शकतो, हेदेखील सिद्ध झाले आहे. वयाची तिशी पार केल्यानंतर सहसा कोणताही खेळाडू इतका फिट राहत नाही. परंतु रोनाल्डोने इतिहास बदलला आहे. त्याने जगभरातील फुटबॉलप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे रोनाल्डो पुढच्या वर्ल्डकपमध्येदेखील खेळू शकतो. यंदाच्या विश्वकप स्पर्धेत इजिप्तकडून एक ४५ वर्षे वयाचा खेळाडू सहभागी झाला होता.

चाहते निश्चिंत!

वयाच्या तिशीनंतर कोणताही खेळाडू इतक्या वेगाने धावू शकत नाही. परंतु रोनाल्डोने तो सर्वोत्कृष्ट असल्याचे सिद्ध केले आहे. जे लोक रोनाल्डोला निवृत्तीचा सल्ला देत होते, त्यांना रोनाल्डोने उत्कृष्ट फिटनेस सिद्ध करून त्यांचे तोंड कायमचे बंद केले आहे. रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून रोनाल्डो पुढच्या वर्ल्डकपमध्ये दिसणार असा विश्वास त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.

 

First Published on: July 24, 2018 7:47 PM
Exit mobile version