IPL 2021 : CSK vs KKR ‘चेन्नई सुपर किंग्ज’च विजेता ! सुपर सामन्यात ‘किंग’ परफॉर्मन्स

IPL 2021 : CSK vs KKR ‘चेन्नई सुपर किंग्ज’च विजेता ! सुपर सामन्यात ‘किंग’ परफॉर्मन्स

अतिशय चुरशीच्या अशा सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील सीएसके संघाने केकेआर विरोधात विजय खेचून आणत यंदाच्या आयपीएल २०२१ ट्रॉफिवर नाव कोरले. महेंद्रसिंह धोनीच्या सीएसके संघाने दुबईमध्ये झालेल्या दुसऱ्या हंगामात पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफिवर आपले वर्चस्व मिळवले. धोनीच्या संघाने क्लिनिकल असा परफॉर्मन्स करत आजच्या सामन्यात अतिशय प्रभावी अशी खेळी केली. मग फलंदाजी असो वा गोलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण सगळ्यात क्षेत्रात धोनीचा संघ उजवा ठरला. आयपीएलच्या पहिल्या हंगामात थोडाशा मागे पडलेल्या संघाने दमदार अशी कामगिरी करत सीएसके प्रभावी आणि भक्कम दावेदार संघ का होता याच कामगिरीचे आज प्रदर्शन केले. केकेआर विरोधात २७ धावांनी सीएसकेने सामना जिंकत यंदाच्या ट्रॉफिवर आपले नाव कोरले. चेन्नई सुपर किंग्जने चौथ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर आपले नाव कमावले.

गेल्या सामन्यातील मॅच विनर राहुल त्रिपाठीने महत्वाच्या सामन्यात निराशा केली. अवघ्या दोन धावांमध्ये शार्दुल ठाकुरने त्यांना डगआऊटमध्ये पाठवले. त्याआधीच फॉर्मात असलेल्या शुभनम गिलने एनवेळी विकेट टाकल्याने केकेआरची खूपच पंचायत झाली. शुभनम गिल ५१ धावा करून बाद झाला चहरने मोक्याच्या वेळी विकेट काढत सीएसकेला सामन्यात पकड मिळवून दिली. तोवर सामन्यात केकेआरवर खूपच दबाव निर्माण झाला.दीपक चहरने एक कमालीचा कॅच पकडत संपुर्ण सामन्याचे चित्रच पालटले. हेजलवुडच्या गोलंदाजीवर एक अतिशय उत्तम कॅच घेत सुंदर कामगिरी केली. ओपनिंगने चांगली सुरूवात करून दिल्यानंतरही मधल्या क्रमातील फलंदाजांनी मात्र खूपच निराशा केली. व्यंकटेश अय्यरची ५० धावांची खेळी वगळली तर कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. नीतीश राणा, सुनिल नरेन, इऑन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकीब अल हसन आणि राहुल त्रिपाठी यासारखे खेळाडू १० धावांच्या आतच बाद झाले. मावीने काही षटकार मारून थोडासा प्रयत्न केला खरा. पण त्याचा विशेष फरक पडला नाही.

सीएसकेने १९३ धावांचे लक्ष्य केकेआरला दिले होते. या सामन्यात सीएसकेने सुरूवातीपासूनच चांगला खेळ केला होता. सीएसकेने पहिल्यांदा बॅटिंग करत मोठे लक्ष्य हे आयपीएलसारख्या सामन्यात दिले होते. या धावांचा पाठलाग करताना केकेआरची दमछाक झाली. केकेआरच्या महत्वाच्या खेळाडूंनी आजच्या सामन्यात निराशा केली. चेन्नईकडून आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने ३२ धावा केल्या. फाफ ड्युप्लेसीने ८६ धावा केल्या. रॉबिन उथप्पा ३१ तर मोईन अलीने ३७ धावा केल्या. या चारही फलंदाजांनी मिळून १९२ धावांचा डोंगर उभारला.

 

First Published on: October 15, 2021 11:29 PM
Exit mobile version