IPL 2021 : धावा होत नसल्या तरी पृथ्वी शॉला सराव नकोसा! 

IPL 2021 : धावा होत नसल्या तरी पृथ्वी शॉला सराव नकोसा! 

पृथ्वी शॉ

यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, दिल्लीला जेतेपद पटकावण्यासाठी युवा सलामीवीर पृथ्वी शॉने चांगली कामगिरी करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे. पृथ्वीवर मागील काही काळात बरीच टीका झाली आहे. त्याला आयपीएलच्या मागील मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना त्याला १३ सामन्यांत केवळ २२८ धावा करता आल्या. तसेच संपूर्ण मोसमात तो केवळ दोन अर्धशतके करू शकला. मात्र, धावा होत नसल्या तरी नेट्समध्ये अधिक मेहनत घेणे आणि फलंदाजी करणे तो टाळायचा. परंतु, आता आयपीएलच्या आगामी मोसमात तो त्याच्या सवयी बदलेल अशी दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला आशा आहे.

सरळ नकार द्यायचा

पृथ्वीची वेगळीच सवय होती. मागील वर्षी त्याला अपेक्षित कामगिरी करता येत नव्हती आणि धावा होत नाही म्हणून तो नेट्समध्ये फलंदाजी करत नव्हता. मात्र, जेव्हा त्याच्या धावा होत असतील, तेव्हा तो नेट्समध्येही सतत फलंदाजी करत राहायचा. मागील मोसमात चार किंवा पाच सामन्यांत तो १० हूनही कमी धावा करून बाद झाला होता. त्यावेळी ‘आपण नेट्समध्ये जाऊन तुझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू’ असे मी त्याला सांगायचो. मात्र, तो सरळ मला नकार द्यायचा. मी आज नेट्समध्ये फलंदाजी करणार नाही असे तो मला सांगायचा. आता त्याने त्याच्या सवयींमध्ये बदल केला असेल अशी मला आशा आहे. मागील काही महिन्यांत त्याने त्याच्या खेळावर खूप मेहनत घेतल्याचे पॉन्टिंग म्हणाला.

सर्वोत्तम कामगिरी करेल अशी आशा

पृथ्वीने आयपीएलचा मागील मोसम, तसेच भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केली. मात्र, त्यानंतर मुंबईकडून खेळताना त्याने विजय हजारे करंडकात ८ सामन्यांमध्ये सर्वाधिक ८२७ धावा फटकावल्या. त्यामुळे यंदाच्या आयपीएल मोसमात तो सर्वोत्तम कामगिरी करेल अशी पॉन्टिंगला आशा आहे.

First Published on: April 5, 2021 10:14 PM
Exit mobile version