धोनीमुळे २०११ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोनदा टॉस झाला!

धोनीमुळे २०११ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोनदा टॉस झाला!

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २०११ मध्ये विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केले. परंतु, हा सामना सुरु होण्याआधीच थोडा गोंधळ झाला होता. या सामन्यात दोनदा नाणेफेक झाले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दोनदा नाणेफेक झाल्याने चाहत्यांमध्ये बरीच चर्चा झाली. मात्र, वानखेडेवर खूप प्रेक्षक होते आणि ते आवाज करत होते, त्यामुळे हा गोंधळ झाला. मी हेड मागितले की टेल हे धोनीला कळले नाही आणि त्याने दुसर्‍यांदा नाणेफेक करण्यास सांगितले, असे तेव्हाच्या श्रीलंकन संघाचा कर्णधार कुमार संगकारा म्हणाला.

वानखेडेवर झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी खूप प्रेक्षक होते. एकदा ईडन गार्डन्सवर खेळताना मी यष्टिरक्षण करत होतो आणि खूप प्रेक्षक असल्याने मी काय बोलत आहे, हे पहिल्या स्लिपमध्ये उभ्या खेळाडूलाही ऐकू येत नव्हते. त्यानंतर असाच काहीसा अनुभव मला वानखेडेवर आला. नाणेफेकीच्या वेळी मी काय मागितले हे धोनीला कळले नाही. तू टेल म्हणालास का असे त्याने मला विचारले. मी हेड म्हणालो असे मी त्याला उत्तर दिले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकले असे सामनाधिकार्‍यांचे म्हणणे होते. परंतु, धोनीने त्यांना विरोध केला. त्याने पुन्हा नाणेफेक करण्यास सांगितले आणि मी पुन्हा हेडच म्हणालो. अखेर आम्ही नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली, असे संगकाराने सांगितले. तो भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनशी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून बोलत होता.

अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज दुखापतीमुळे त्या सामन्यात खेळू शकला नव्हता. मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत आम्हाला प्रथम फलंदाजी करणे भाग पडले असे संगकाराने सांगितले. त्या सामन्यासाठी संघात बरेच बदल करावे लागणे आम्हाला महागात पडले. अँजेलो जर त्या सामन्यात खेळला असता, तर आम्ही नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण केले असते. अँजेलो नसल्याने आमच्या संघातील समतोल बिघडला. तो सातव्या क्रमांकावर येऊन चांगली फलंदाजी करायचा आणि उपयुक्त षटकेही टाकायचा, असे संगकारा म्हणाला.

काय घडले त्या सामन्यात?
२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. महेला जयवर्धने (नाबाद १०३), कर्णधार कुमार संगकारा (४८) आणि तिलकरत्ने दिलशान (३३) यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे श्रीलंकेने ५० षटकांत ४ बाद २७४ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ११४ अशी अवस्था होती. परंतु, गौतम गंभीर (९७) आणि कर्णधार (नाबाद ९१) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारताने २७५ धावांचे लक्ष्य ४८.२ षटकांत गाठत दुसर्‍यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

First Published on: May 30, 2020 5:20 AM
Exit mobile version