स्थानिक क्रिकेटपटूंनाही वार्षिक करार द्या; उनाडकट, जॅक्सन यांची मागणी

स्थानिक क्रिकेटपटूंनाही वार्षिक करार द्या; उनाडकट, जॅक्सन यांची मागणी

स्थानिक क्रिकेटपटूंनाही वार्षिक करार द्या; जयदेव उनाडकटसह इतरांची मागणी

कोरोनामुळे मागील मोसमात रणजी करंडक स्पर्धा होऊ न शकल्याने क्रिकेटपटूंचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. परंतु, केवळ नुकसान भरपाई पुरेशी नसून स्थानिक क्रिकेटपटूंनाही वार्षिक करार देण्याची मागणी जयदेव उनाडकट, शेल्डन जॅक्सन आणि हरप्रीत सिंग भाटिया यांसारख्या खेळाडूंनी केली आहे. मागील महिन्यात माजी भारतीय क्रिकेटपटू रोहन गावस्करने राज्य क्रिकेट संघटनांनी खेळाडूंना करारबद्ध करून त्यांना सामन्याच्या वेतनाव्यतिरिक्तही वेतन दिले पाहिजे असे म्हटले होते. स्थानिक क्रिकेटमधील बऱ्याच क्रिकेटपटूंना आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे ते स्थानिक क्रिकेट खेळून मिळणाऱ्या वेतनावर अवलंबून असतात.

अव्वल ३० खेळाडूंना करारबद्ध करावे

सौराष्ट्रचा कर्णधार आणि भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या मते प्रत्येक राज्यातील अव्वल ३० खेळाडूंना राज्य क्रिकेट संघटनांनी करारबद्ध करणे गरजेचे आहे. कोरोनापूर्वीच स्थानिक क्रिकेटपटूंना वार्षिक करार देण्याबाबत चर्चा सुरु झाली होती. विविध वयोगटातील (१६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील इ.) क्रिकेटपटूंनाही नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल. तसेच तुम्ही राज्यातील प्रत्येक क्रिकेटपटूला करारबद्ध करून घेऊ शकत नाही. परंतु, तुम्ही अव्वल ३० खेळाडू निवडून त्यांच्याशी वार्षिक करार केला पाहिजे, असे उनाडकट म्हणाला.

महिला क्रिकेटपटूंनाही करारबद्ध करा

स्थानिक क्रिकेटचा पूर्ण मोसम पार पडल्यास एका खेळाडूला वेतनाच्या स्वरूपात साधारण १५ ते १६ कोटी रुपये मिळतात. परंतु, मागील मोसमात ८७ वर्षांत पहिल्यांदाच रणजीचा मोसम रद्द करण्यात आला. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केवळ पुरुष क्रिकेटपटू नाही, तर राज्य क्रिकेट संघटनांनी महिला क्रिकेटपटूंनाही करारबद्ध करून घेतले पाहिजे, असे पुदुच्चेरीचा खेळाडू शेल्डन जॅक्सनला वाटते.

First Published on: June 2, 2021 11:12 PM
Exit mobile version