FIFA 2018 : कर्णधार हॅरी केनने इंग्लंडला तारले

FIFA 2018 : कर्णधार हॅरी केनने इंग्लंडला तारले

इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी केन

इंग्लंडने आपल्या पहिल्या विश्वचषकाच्या सामन्यात ट्युनिशियाला २-१ ने पराभून करत विजयी सलामी दिली. तब्बल २० वर्षानंतर इंग्लंड ट्युनिशिया विश्वचषकात आमने-सामने आले होते. १९९८ साली खेळल्या गेलेल्या सामन्यात ट्युनिशियाला २-० च्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा बदला वीस वर्षानंतरही ट्युनिशिया घेऊ शकली नाही.

असा झाला सामना

युरोप खंडातील इंग्लंड तर आफ्रिका खंडातील ट्युनिशिया हे दोन्ही देश अनेक गोष्टीत भिन्न आहेत. तरीही हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरूवातीला ११ व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने गोल मारत संघाला १ – ० ने आघाडी मिळवून दिली. मात्र काही वेळातच ट्युनिशियाच्या संघाकडून सॅसीने ३५ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत सामन्यात पुनरागमन केले. यानंतर १-१ गोल असताना दोन्ही संघाकडून गोलचे बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र कोणालाही यश आले नाही. मध्यंतरानंतरही १-१ अशीच परिस्थिती असताना सामना अनिर्णित ठरतो की काय असे सर्वांना वाटू लागले, तेव्हा अतिरीक्त वेळेत पुन्हा एकदा कर्णधार हॅरी केनने गोल मारुन संघाला २-१ असा विजय मिळवून दिला.

हॅरी केन गोल करताना

इंग्लंड फुटबॉलसाठी मागील वर्षभराचा काळ अत्यंत भरभराटीचा ठरला आहे. पहिले फिफा अंडर २० आणि फिफा अंडर १७ विश्वचषकाचे विजेतेपद इंग्लंडने मिळवत जागतिक फुटबॉलमध्ये आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले.आता इंग्लंड सिनीयर फुटबॉल संघाने देखील विश्वचषकाची सुरूवात विजयाने केल्यामुळे इंग्लंडमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

First Published on: June 19, 2018 4:00 PM
Exit mobile version