४ बाद ९९ अशी अवस्था, बरेच झाले !

४ बाद ९९ अशी अवस्था, बरेच झाले !

कर्णधार कोहली प्रशिक्षक शास्त्रींना म्हणाला

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने ६ विकेट राखून जिंकला. या सामन्यात केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनीने १४१ धावांची अभेद्य भागीदारी करत भारताला हा विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जाधव आणि धोनी हे दोघे फलंदाजीला आले तेव्हा भारताची ४ बाद ९९ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी मी रवी शास्त्रींना म्हणालो की आपली अशी अवस्था आहे, हे एकाअर्थी बरेच आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

आमच्या गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसतानाही आम्ही पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. रात्रीच्या वेळी (जेव्हा ऑस्ट्रेलिया गोलंदाजी करत होता) गोलंदाजांना जास्त मदत मिळत होती हे पाहून मला जरा आश्चर्यच वाटले. मात्र, आमच्याकडे धोनीचा अनुभव आणि केदारसारखा प्रतिभावान खेळाडू होता. या दोघांनी अप्रतिम भागीदारी केली. आमची जेव्हा ४ बाद ९९ अशी अवस्था झाली होती, त्यावेळी मी रवी शास्त्रींना म्हणालो की आपली अशी अवस्था आहे, हे एकाअर्थी बरेच आहे. या दोघांनी आपल्याला सामना जिंकवून दिला पाहिजे. धोनी आणि केदार यांनी ज्या जबाबदारीने खेळ केला आणि सामना जिंकवला ते पाहून खूप बरे वाटले, असे कोहली म्हणाला.

तसेच पहिल्या सामन्यात ४४ धावांत २ विकेट घेणार्‍या मोहम्मद शमीचे कोहलीने कौतुक केले. शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे पुनरागमन केले आहे, ते खरेच वाखाणण्याजोगे आहे. तो याआधी इतका फिट कधीच नव्हता. त्याने आपले वजन ५-६ किलोंनी कमी केले आहे. त्याच्यात विकेट मिळवण्याची क्षमता आहे आणि त्याला फलंदाजांना माघारी पाठवायची भूक आहे. विश्वचषकाआधी तो फॉर्मात येणे हे भारतासाठी खूपच चांगले आहे, असे कोहलीने सांगितले.

First Published on: March 5, 2019 4:57 AM
Exit mobile version