फिटनेस सुधारण्यावर लक्ष!

फिटनेस सुधारण्यावर लक्ष!

राणी रामपाल

भारतीय महिला हॉकी संघाने सलग दुसर्‍यांदा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे. २०२० टोकियो ऑलिम्पिकआधी पुरेसा सराव मिळावा यासाठी भारतीय संघ बरेच सामने खेळणार आहे. या सामन्यांत आम्ही फिटनेस सुधारण्यावर लक्ष केंद्रित करु, असे विधान कर्णधार राणी रामपालने केले. भारतीय महिला संघाचे सध्या बंगळुरू येथे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. या संघाला ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त तीन आठवड्यांची विश्रांती मिळणार आहे. त्यानंतर ५ जानेवारीपासून न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारताचे सराव शिबीर सुरु होईल.

आम्ही फिटनेस सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. ऑलिम्पिकच्या आधी सर्वोत्तम संघांविरुद्ध जास्तीतजास्त सामने खेळण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, हे सामने खेळत असतानाच शारीरिक आणि मानसिक फिटनेसवर लक्ष देणे गरजेचे आहे. ऑलिम्पिकच्या वेळी टोकियोतील वातावरण कसे असेल याचा आम्हाला अंदाज आहे आणि तिथे खेळताना फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावेल, असे राणी म्हणाली.

महिला संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला!
भारतीय महिला संघाने मागील काही काळात स्पेन, आयर्लंड, जपान, चीन, कोरिया आणि इंग्लंड यांसारख्या संघांवर विजय मिळवले आहे. त्याविषयी राणी रामपालने सांगितले, भारताचा महिला हॉकी संघ मोठ्या संघाविरुद्ध जिंकू शकतो असे फार लोकांना वाटत नव्हते. आम्ही केवळ महत्त्वाच्या स्पर्धेत भाग घेतल्याचे लोकांना समाधान वाटायचे. मात्र, आता त्यांचा महिला संघाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये दमदार कामगिरी करत आम्ही स्वतःला सिद्ध केले आहे.

First Published on: December 13, 2019 5:03 AM
Exit mobile version