गांगुली बुधवारपासून सांभाळणार बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार!

गांगुली बुधवारपासून सांभाळणार बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार!

सौरव गांगुली

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली बुधवारपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहे. तो बीसीसीआयचा ३९ वा अध्यक्ष असेल. बुधवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा ३३ महिन्यांचा कार्यकाळही संपणार आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणारा गांगुली हा एकमेव उमेदवार होता. त्यामुळे त्याची निवड ही केवळ औपचारिकता उरली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची सचिव म्हणून, माहीम वर्मा यांची उपाध्यक्षपदी नेमणूक होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ हे खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज हे सहसचिव असणार आहेत.

गांगुलीला केवळ ९ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. कार्यकाळ किती याने फरक पडत नाही, मला काहीतरी चांगले करण्याची संधी मिळत आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे, असे गांगुली म्हणाला होता. तसेच आठ सदस्यांची ही समिती बीसीसीआयची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करेल, असेही गांगुलीने सांगितले होते.

First Published on: October 23, 2019 5:19 AM
Exit mobile version