फुटबॉलर मेसूट ओझीलचा जर्मनी संघाला रामराम!

फुटबॉलर मेसूट ओझीलचा जर्मनी संघाला रामराम!

मेसूट ओझील

जर्मनीचा आक्रमक फुटबॉलर ओझील हा मूळचा टर्कीश वंशाचा असून तो जर्मनीकडून खेळत होता. मात्र जर्मनीचे फुटबॉल प्रमुख ऑलिव्हर बाइरहॉफ यांनी त्याच्यावर त्याला देशाबद्दल अभिमान नसल्याची टिका केल्यानंतर त्याने जर्मनीचा राष्ट्रीय संघ सोडला आहे. ओझीलने आपल्या ऑफिशिअल टि्वटर हॅंडलवरून एक पोस्ट टाकत आपण संघ सोडत असल्याचे जाहीर केले आहे.


मेसूट ओझील हा जरी मूळचा टर्कीचा असला तरी देखील तो गेली बरीच वर्षे जर्मनीच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून अटॅकिंग मिडफिल्डरच्या स्थानावर खेळत होता. मात्र, त्याच्या आणि जर्मन फुटबॉल महासंघातील वादामुळे त्याने अचानक संघ सोडल्याने फुटबॉल जगतात खळबळ उडाली आहे. ओझीलच्या राजीनाम्याचा विषय सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

नक्की का सोडला ओझीलने संघ?

काही दिवसांपूर्वी ओझीलने टर्की देशाचे राष्ट्राध्यक्ष एदरेगन यांची भेट घेतली होती. ओझीलचा आणि एदरेगन यांचा एक फोटोही सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत होता. त्याच्या या भेटीवर जर्मनीच्या फुटबॉल प्रमुख ऑलिव्हर बाइरहॉफ यांनी म्हटले होते की, “ओझीलला जर्मनी देशाबद्दल अभिमान नाही.” ऑलिव्हर यांच्या या टिकेनंतर ओझीलच्या वडिलांनीही त्याला संघ सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ओझीलने त्यावर काहीच न बोलता थेट आता संघाचा राजीनामा द्यायचा मोठा निर्णय घेतला आहे.

ओझील टर्की देशाचे राष्ट्राध्यक्ष एदरेगन यांची भेट घेताना

ओझील जर्मनीच्या अंडर १९ आणि अंडर २१ संघाकडूनही खेळला होता. त्याने जर्मनी सीनिअर संघाकडून खेळताना ९२ सामन्यांत २३ गोल केले होते. त्याने जर्मनीकडून खेळताना बऱ्याच सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्या इतक्या अप्रतिम कामगिरीनंतर त्याच्यावर केलेली टिका आणि त्यामुळे ओझीलने दिलेला राजीनामा हे सर्वच प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून फुटबॉल विश्वात याची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

मेसूट ओझील जर्मनी संघाकडून खेळताना
First Published on: July 23, 2018 8:41 PM
Exit mobile version