ऑलिम्पिक चाचणीत चांगल्या कामगिरीचे लक्ष्य!

ऑलिम्पिक चाचणीत चांगल्या कामगिरीचे लक्ष्य!

हॉकीपटू मनदीप सिंगचे उद्गार

आगामी ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे आमचे लक्ष्य आहे, जेणेकरून २०२० मधील टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीआधी आमचा आत्मविश्वास वाढेल, असे विधान भारताच्या हॉकी संघाचा उपकर्णधार मनदीप सिंगने केले. भारतीय हॉकी संघ १७ ऑगस्टपासून टोकियो येथे सरू होणार्‍या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत भारतासमोर जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असणार्‍या मलेशिया, जागतिक क्रमवारीत ८ व्या स्थानी असणार्‍या न्यूझीलंड आणि यजमान जपानचे आव्हान असणार आहे.

ऑलिम्पिक चाचणी स्पर्धा ही टोकियोमध्येच होणार असल्याने या स्पर्धेतील अनुभवाचा आमच्या संघातील युवा खेळाडूंना फायदा होईल. तसेच टोकियोत खेळल्यामुळे आम्हाला पुढील वर्षी होणार्‍या ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी प्रेरणा मिळेल. आम्ही या स्पर्धेत मलेशिया, जपान आणि न्यूझीलंड या उत्कृष्ट संघांविरुद्ध खेळणार आहोत. दुसरीकडे आमच्या संघात बर्‍याच युवा खेळाडूंचा समावेश आहे. तसेच काही खेळाडू पुनरागमन करत आहेत. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे, असे मनदीप म्हणाला.

भारतीय संघ जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असल्यामुळे त्यांना ही स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहे.

First Published on: August 9, 2019 5:28 AM
Exit mobile version