रमेश पोवारनाच प्रशिक्षक ठेवा !

रमेश पोवारनाच प्रशिक्षक ठेवा !

हरमनप्रीत कौर आणि स्मृती माधंनाच्या हातात भारतीय संघाची कमान

भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी खेळाडू मिताली राज आणि माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला. या वादामुळे पोवार यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयने त्यांचा करार वाढवला नाही. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले असून, पोवार दुसऱ्यांदा या पदासाठी अर्ज करू शकतात. पण त्यांची या पदावर पुन्हा नियुक्ती होईल यात शंकाच आहे. असे असले तरी टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्म्रिती मानधनाने रमेश पोवारनाच पुन्हा प्रशिक्षक बनवण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे.

मितालीला वगळण्याचा निर्णय फक्त प्रशिक्षकाचा नाही 

हरमनप्रीत आणि स्म्रितीने बीसीसीआयच्या प्रशासक समितीला पत्र लिहिले. हरमनप्रीतने तिच्या पात्रात लिहिले की, ‘मितालीला उपांत्य फेरीतील संघातून वगळण्याचा निर्णय हा एकट्या प्रशिक्षकाचा नव्हता. तो निर्णय मी, उपकर्णधार स्म्रिती मानधना, निवड समिती सदस्य (सुधा शहा) आणि रमेश पोवार यांनी मिळून घेतला होता. हा निर्णय संघाच्या हितासाठीच घेतला होता. रमेश पोवार प्रशिक्षक झाल्यापासून आमच्या संघात खूप सकारात्मक बदल घडले आहेत.  रमेश पोवार यांनी आम्हाला खेळाडू म्हणून सुधारले. तसेच त्यांनी आम्हाला ठरवलेली लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता जर प्रशिक्षक बदलला तर आम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल. पुढील टी-२० विश्वचषकाला अवघे १५ महिने बाकी आहेत. त्यामुळे टी-२० संघाची कर्णधार आणि एकदिवसीय संघाची उपकर्णधार म्हणून मी तुम्हाला रमेश पोवारनाच प्रशिक्षक ठेवा अशी विनंती करते.’

पोवार यांच्यामुळे आत्मविश्वास वाढला 

तसेच स्म्रिती मानधनानेही तिच्या पत्रातून पोवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. ज्यात तिने लिहिले, ‘पोवार प्रशिक्षक झाल्यापासून आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. त्यामुळेच आम्ही सलग १४ टी-२० सामने जिंकलो होतो. तेच पुढेही प्रशिक्षक राहिले तर आम्ही आणखी प्रगती करू.’
First Published on: December 4, 2018 11:06 PM
Exit mobile version