… ते क्रिकेट समालोचक अर्थात कॉमेंटेटर्स

… ते क्रिकेट समालोचक अर्थात कॉमेंटेटर्स

कॉमेंटेटर्स

एक काळ असा होता की, लोकांना रेडिओचं मोठं आकर्षण होतं. गीत रामायण, बिनाका गीतमाला याप्रमाणंच क्रिकेट सामना प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहणं शक्य नसणारे, दुधाची तहान ताकावर या न्यायानं, रेडीओवरील त्याचं समालोचन ऐकणंच पसंत करत. दीघर्र्काळपर्यंत हे समालोचन इंग्रजीमधूनच होत असे. त्याची एवढी सवय अनेकांना झाली होती की, कालांतरानं मातृभाषेतून समालोचन सुरू झाल्यानंतरही अनेकांना इंग्रजी समालोचनच आवडत असे. त्याचंही कारण होतं. इंग्रजी समालोचक-कॉमेंटेटर्स अतिशय सुंदर आणि सहजपणे हे वर्णन करत. त्यात भाषेची समृद्धी असेच, शिवाय सर्वसामान्य क्रिकेटप्रेमीलाही ते समजायला हवं, याची खबरदारी ते घेत. त्यामुळंच त्यांना लोकप्रियता मिळाली होती. हे आठवण्याचं कारण अनंत सेटलवाड दिवंगत झाल्याची बातमी आली आणि या कॉमेंटेटर्सच्या आठवणी जाग्या झाल्या.

कसोटी सामन्याच्या दिवशी सकाळपासूनच काही जणांची प्रतीक्षा सुरू होत असे. कधी एकदा ती वेळ येते आणि आपण रेडिओ सुरू करतो असं त्यांना व्हायचं आणि त्या वेळी रेडिओ सुरू झाल्यावर प्रथम केंद्राचा उद्घोषक सांगे, नाऊ ओव्हर टु स्टेडियम. अवर कॉमेंटेटर्स आर … मग थोडा वेळ किंचित घरघर. मग आवाज यायचा ः गुड मॉर्निंग लिसनर्स, धिस इज … रिपोर्टिंग टु यू.. हा धिस इज दर वेळी वेगळा असायचा. विजय मर्चंट, डिकी रत्नागर (हे मुळातील भारतीय, नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झाले), पिअर्सन सुरीटा, नॉबी क्लार्क, शरदेंदु सन्याल, व्ही एम.चक्रपाणी (थोड्याच काळानंतर ऑस्ट्रेलियाच्या ए.बी.सी. नं त्यांना याच कामासाठी बालावून घेतले होते), देवराज पुरी (नरोत्तम पुरी यांचे वडील, हेही नंतर रेडिओवर समालोचन करत.) सुरेश सरैया इ. आणि यांच्या बरोबरच आठवतात ते काही परदेशी समालोचक मायकेल चार्ल्स्टन, वेस्ट इंडीजचे टोनी कोझिअर तसेच पाकिस्तानचे उमर कुरेशी. आणि एक रत्न होतं. त्याचं नाव महाराज कुमार ऑफ विजयनगरम ऊर्फ व्हिझी.

विजयभाई मर्चंट हे तर अगदी जेमतेम इंग्रजी समजणार्‍यांनाही कळू शकेल, इतकी सोपी भाषा वापरत. जोडीला त्यांचं क्रिकेटचं ज्ञान आणि अनुभव. जस्ट टु इन्फॉर्म यू लिसनर्स … असं म्हणून ते एखाद्या बाबीचे बारकावे सांगत. क्वचित प्रसंगी नीट समजावून देत. श्रोत्यांना विसात घेण्याचं त्यांचं कसब कायमच लक्षात राहण्याजोगं होतं. कित्येकदा एखादा निर्णय कर्णधारानं काय कारणानं घेतला असावा, याचा अंदाजही ते व्यक्त करत. फटका मारताना फलंदाजाचा पवित्रा कसा होता ते सांगत. एखादा त्यात चुकला तर तेही सांगत. डिकी हे मित्रांसोबत सामना बघत असल्यासारखं बोलत. मध्येच ते व्हॉट डु यू थिंक विजय / वा अनंत? अशी पृच्छा करायचे आणि मग आपण जणू त्यांच्याबरोबरच बसून सामना बघत आहोत असं वाटायचं. अनंत सेटलवाड यांचा आवाज हेच अनेकांना आकर्षण होते आणि ते मधूनच हलक्या फुलक्या भाषेत बोलत. टिप्पणी करत आणि श्रोत्यांप्रमाणे सहकार्‍यांचीही दाद मिळवत. मर्चंट यांच्याबरोबर त्यांची विश्रांतीच्या काळातील चर्चाही ऐकण्यासारखी आणि माहितीपूर्ण असायची आणि वारंवार आनंदजी डोसा यांनी अचूक आकडेवारी पुरवल्याचाही ते उल्लेख करत. या तिघांचं समालोचन हा एक वेगळाच समाधान देणारा अनुभव होता.

पिअर्सन सुरीटा यांचा आवाज प्रगल्भ आणि जरासा गंभीर वाटे तसा मायकेल चार्ल्स्टन यांचाही. पण दोघांचंही समालोचन ऐकत राहावं असं वाटायचं. देवराज पुरी श्रोत्यांना काय हवंय याची जाण ठेवत. पण एकदा त्यांच्याच एका टिप्पणीनं प्रेक्षकांना पंचाच्या निर्णयाबाबतचं आपलंच मत बरोबर असल्याचं वाटलं आणि त्यांनी दंगाच सुरू केला होता. पंचांचे निर्णय तेव्हाही वादग्रस्त असतच. (त्याचा परिणाम म्हणून त्यांना या कामातून वगळलं होतं.) पण हा अपवादच. प्रेक्षकांना भडकावण्याचे काम न करता ते काही प्रमाणात शांत करण्याची जबाबदारीच पार पाडत. कारण त्यावेळी स्टेडियममध्ये ट्रान्झिस्टर नेणारे अनेक प्रेक्षक असत. ते सांगत की आपल्यापेक्षा पंच खूप जवळून हे सारं बघत असतो त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. पण त्याबरोबरच ते काम किती अवघड आहे ते सांगत. त्यांना निर्णय तात्काळ, काही क्षणांतच घ्यायला लागतो, त्यामुळं ती बाबही विचारात घ्यायला हवी असं बजावत. निर्णयामुळं खेळाडू नाराज दिसला तर त्याचं वागणं बरोबर नाही, कारण मैदानावर पंचच सर्वेसर्वा आहे याची जाणीव त्यानं ठेवायला हवी असं म्हणत. त्यामुळं प्रेक्षकही हे लेकी बोले सुने लागे असं मानून गप्प होते.

बॉबी तल्यारखान यांचा दीर्घकाळ प्रभाव होता आणि ते एकट्यानेच दिवसभर समालोचन करत. पण आमच्यासारख्यांना त्यांना ऐकण्याची संधी मिळाली तेव्हा मात्र त्यांचं समालोचन खिळवून ठेवणारं नव्हतं. एकतर त्यांचं वय झालं होतं आणि त्यांची धाटणीही इतरांच्या तुलनेत फीकी वाटायची. त्याऐवजी त्यांचा टाइम्स ऑफ इंडियातला स्तंभ वाचणं अधिक चांगलं वाटायचं. काळाचा महिमा असावा. कारण त्यांची पूर्वीची वर्णनं ऐकणारे भरभरून त्याची वर्णनं करायचे.

भारतीय संघ परदेशात खेळत असला तरी आकाशवाणीवर समालोचन असे आणि बर्‍याचदा आपले समालोचकच पाठवले जात. इंग्लंडमधील अशाच एका कसोटीत (1971 सालची) भारताची न भूतो अशी पडझड झाली आणि डाव जेमतेम 42 धावांत आटोपला. त्यावेळी स्कोअरर म्हणून गेलेले नारायण ठकार बहुतेक खूपच हळवे झाले असावेत, कारण त्यावेळी डिकी रत्नागर यांनी ः चिअर अप नारायण! असं म्हणून जणू त्यांची समजूत घातल्यासारखं केलं होतं. त्यावरून नंतर कित्येकदा नारायण दिसला की त्याला भेटणारा स्नेही चिअर अप नारायण! अशी सलामी देत असे. तेच विश्वचषक कपिलच्या संघानं जिंकला तेव्हा तेथील कल्लोळ एवढा होता की, समालोचकाचा आवाचही ऐकू येईनासा झाला होता. अर्थात विजयाच्या आनंदात त्याचं फारसं काही वाटलं नव्हतं, कारण त्या कल्लोळानंच भारत जिंकल्याचं जगजाहीर केलं होतं.

आणि सरतेशेवटी व्हिझी. अतिशय रटाळ एवढंच त्यांच्या समालोचनाचं वर्णन करता येईल. काहीही अगदी असंबद्ध असं ते बोलत. कोणत्याही वेळी कोणत्याही आठवणी सांगत आणि त्यांच्या दृष्टीनं अचूक वर्णन करत. उदा. कॅप्टन टु कॅप्टन.. लीडर टु लीडर असं ते म्हणत. पॉली उम्रिगर यांना गोलंदाजी करण्यासाठी खेळाडूनं (बहुधा सोबर्स) स्टार्ट घेतला की अ‍ॅन्ड नाऊ लाँग हँडवाला टु पामट्रीवाला असं सांगत. त्यांच्या या संथगतीनं दरम्यान षटकातले दोनतीन चेंडू झालेले असायचे पण त्यांना त्याची फिकीर कधीच नसे. आठवणी अनेक आहेत, पण शब्दमर्यादेमुळं या लोकांच्या आठवणीबरोबरच अनंत सेटलवाड यांना श्रद्धांजली वाहून मर्चंट यांच्याच धर्तीनं म्हणतो …
अ‍ॅन्ड नाउ, एन्टरटेनमेंट फॉर द डे ईज ओव्हर, जंटलमेन!…

First Published on: August 12, 2019 5:11 AM
Exit mobile version