बजरंगला तयार करण्यासाठी सोडली कुस्ती – योगेश्वर दत्त

बजरंगला तयार करण्यासाठी सोडली कुस्ती – योगेश्वर दत्त

योगेश्वर दत्त

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने यावर्षी दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवले. तर जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत त्याने दोन पदके मिळवली. अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत दोन पदके मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता. त्याला ही कामगिरी करण्यासाठी योगेश्वर दत्तचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. २०१२ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वरने बजरंगला २०२० ऑलिम्पिकसाठी तयार करायचे म्हणून आपण निवृत्त झालो असे म्हटले आहे.

मला २०२० पर्यंत खेळणे शक्य नव्हते

योगेश्वर म्हणाला, “बजरंग हा खूप चांगला कुस्तीपटू आहे. त्याच्याकडे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता आहे. मला २०२० पर्यंत खेळणे शक्य नव्हते. त्यामुळे २०२० ऑलिम्पिकसाठी मी बजरंगला तयार करण्याचा निर्णय घेतला आणि मी निवृत्त झालो.”
बजरंग पुनिया (सौ-DNA)

बजरंगला तयार करणे हाच योग्य निर्णय

योगेश्वरने २०१० आणि २०१४ अशा २ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्याने २०१४ एशियाडमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. तसेच त्याने ४ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे त्याच्यासाठी कुस्तीतून निवृत्त होण्याचा निर्णय सोपा नव्हता. याविषयी तो म्हणाला, “निवृत्त होण्याचा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. जर बजरंग नसता तर मी कदाचित निवृत्त झालोही नसतो. पण मला वाटले की बजरंगला तयार करणे हाच योग्य निर्णय आहे. तो फक्त २४ वर्षांचा आहे. त्याच्यात खूप प्रतिभा आहे. तो खूप मेहनती आहे. त्यामुळेच मी त्याच्यावर इतकी मेहनत घेतो आहे. माझी इच्छा आहे की त्याची कारकीर्द ही माझ्यापेक्षाही चांगली असावी.”
First Published on: November 3, 2018 10:38 PM
Exit mobile version