मी कधी फिट होणार कोणास ठाऊक!

मी कधी फिट होणार कोणास ठाऊक!

पृथ्वी शॉचे उद्गार

विश्वचषकाच्या निराशेनंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौर्‍याच्या तयारीला लागणार आहे. ३ ऑगस्टपासून सुरु होणार्‍या या दौर्‍यात भारत एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील २ सामनेही खेळणार आहे. मात्र, या मालिकेत युवा सलामीवीर पृथ्वी शॉ खेळण्याबाबत साशंकता आहे. मागील काही काळ त्याला दुखापतींनी ग्रासले असून तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे त्याला सध्या सुरु असलेल्या भारत अ संघाच्या विंडीज दौर्‍यात भाग घेता आला नाही आणि तो कधी पूर्णपणे फिट होणार हे त्यालाही माहित नाही. मी कधी पूर्णपणे फिट होणार हे सांगणे अवघड आहे, असे कसोटी पदार्पणात शतक लागवणारा पृथ्वी म्हणाला.

मी अजूनही १०० टक्के फिट नाही आणि मी कधी पूर्णपणे फिट होणार हे मलाही ठाऊक नाही. मात्र, मी सध्या फिट होण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे. माझ्याकडे अजूनही वेळ आहे आणि मी फिजिओच्या मदतीने पूर्णपणे फिट होण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी नक्की कधी पुन्हा मैदानात परतणार हे सांगणे अवघड आहे. आता भारताचा वेस्ट इंडिज दौरा आहे आणि लवकरच त्याच्या तयारीला लागण्याचा आमचा मानस आहे, असे पृथ्वीने सांगितले.

पृथ्वीने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये विंडीजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेच्या २ सामन्यांत त्याने १ शतक आणि १ अर्धशतकाच्या मदतीने २३७ धावा केल्या होत्या, पण त्यानंतर दुखापतींमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आलेले नाही. त्याला पायाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.

First Published on: July 16, 2019 4:46 AM
Exit mobile version