कारकिर्दीत मिळवलेल्या यशाबाबत समाधानी; निवृत्त झालेल्या पार्थिव पटेलचे विधान 

कारकिर्दीत मिळवलेल्या यशाबाबत समाधानी; निवृत्त झालेल्या पार्थिव पटेलचे विधान 

पार्थिव पटेल

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पार्थिवने २५ कसोटी, ३८ एकदिवसीय आणि दोन टी-२० अशा एकूण ६५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने या सामन्यांत १६९६ धावा केल्या. तसेच कसोटीत त्याने यष्टींमागे ६२ झेल पकडले आणि १० फलंदाजांना यष्टिचित केले. त्याने निवृत्तीची घोषणा ट्विटरवरून केली. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ‘कारकिर्दीत मिळवलेल्या यशाबाबत मी समाधानी आहे,’ असे पार्थिव म्हणाला.

‘साधारण मागील एका वर्षापासून मी निवृत्तीचा विचार करत होतो. १८ वर्षे प्रथम श्रेणी आणि भारतासाठी क्रिकेट खेळल्यानंतर मी योग्य वेळी निवृत्ती घेत असल्याचे मला वाटते. कारकिर्दीत मिळवलेल्या यशाबाबत मी समाधानी आहे. खेळाडू म्हणून आणि प्रथम श्रेणी संघाचा कर्णधार म्हणून, मी खूप यश मिळवले. आम्ही जवळपास सर्वच स्पर्धा जिंकल्या. मी तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचा भाग होतो. तसेच गुजरात क्रिकेट आता योग्य मार्गावर आहे,’ असे पार्थिव म्हणाला. पार्थिवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तितकीशी छाप पाडता आली नसली तरी स्थानिक क्रिकेटमधील त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. त्याने १९४ प्रथम श्रेणी सामन्यांत २७ शतकांच्या मदतीने ११,२४० धावा फटकावल्या. तसेच त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली.

 

First Published on: December 9, 2020 8:57 PM
Exit mobile version