IND vs SL t20 : श्रीलंकेचा भारतावर विजय; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

IND vs SL t20 : श्रीलंकेचा भारतावर विजय; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

भारत आणि श्रीलंका यांच्या तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर आता श्रीलंकेनेही भारताचा 16 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, प्रथम फलंदाजीवेळी श्रीलंकेने भारतासमोर 6 बाद 138 वरून 20 षटकात 6 बाद 206 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. (ind vs sl 2nd t20 sri lanka beat india today by 16 runs)

श्रीलंकेने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघातील फलंदाजांना चांगली सुरूवात करता आली नाही. फलंदाजीवेळी सुरूवातीला भारताचा निम्मा संघ 57 धावात तंबूत परतला. इशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर हार्दिक पांड्या 12 धावांवर बाद झाला. श्रीलंकेकडून कसुन रजिथाने दोन तर मदुशंका, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे. यानंतर सुर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी 91 धावांची भागिदारी केली. मात्र सूर्यकुमार यादव अर्धशतक झाल्यानतंर उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसंका आणि कुशल मेंडिस यांनी जबरदस्त अशी सुरुवात करून दिली होती. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली. पण युझवेंद्र चहलने कुशल मेंडिसला बाद करून ही जोडी फोडली. मेंडिसने 31 चेंडूत 52 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात उमरान मलिकने भानुका राजपक्षेला 2 धावांवर त्रिफळा उडवत तंबूत धाडले. तर 12 व्या षटकात अक्षर पटेलने पथुम निसंकाला राहुल त्रिपाठीकडे झेल देण्यास भाग पाडले. तर त्यानतंर पुन्हा अक्षर पटेलनेच धनंजय डिसिल्वाला अवघ्या तीन धावांवर बाद केले.

भारतीय संघात आज राहुल त्रिपाठीने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. राहुल त्रिपाठीने नुकतेच विजय हजारे ट्रॉफीत त्रिशतक झळकावले होते. नव्या वर्षात दुसऱ्याच सामन्यात भारतीय संघात पदार्पण करणारा राहुल त्रिपाठी तिसरा फलंदाज आहे. याआधी शिवम मावी आणि शुभमन गिल यांनी पदार्पण केलं होतं.

भारताचा संघ

इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

श्रीलंकेचा संघ

पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कप्‍‍‍‍‍तान), वनिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तीक्षणा, कसुन राजिथा, दिलशान मदुशंका.


हेही वाचा – भारतीय संघापासून दूर पण केदारची तुफान खेळी अद्याप सुरूच; रणजीमध्ये ठोकले द्विशतक

First Published on: January 6, 2023 7:45 AM
Exit mobile version