IND vs SL : तिसऱ्या वनडेत भारताच्या नवख्या खेळाडूंना मिळणार संधी?

IND vs SL : तिसऱ्या वनडेत भारताच्या नवख्या खेळाडूंना मिळणार संधी?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी पार पडणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारताने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भारताला तिसरा एकदिवसीय सामना जिंकत या मालिकेत श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. परंतु, या सामन्यासाठी भारताच्या संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. भारताच्या काही नवख्या खेळाडूंना संधी मिळू शकेल.

संघात काही बदल होण्याची शक्यता

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सात विकेट राखून विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने उत्तम झुंज दिली. परंतु, श्रीलंकेचे आव्हान भारताने पुन्हा एकदा परतवून लावले. या सामन्यात २७६ धावांचा पाठलाग करताना भारताची ७ बाद १९३ अशी अवस्था होती. मात्र, आठव्या क्रमांकावरील दीपक चहरने ८२ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी करत भारताला अनपेक्षित विजय मिळवून दिला. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.

पडिक्कल, गायकवाडला संधी?

पृथ्वी शॉच्या जागी सलामीवीर म्हणून देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल. मात्र, पृथ्वीला संघात कायम ठेवल्यास त्याचे मोठी खेळी करण्याचे लक्ष्य असेल. तसेच मधल्या फळीत मनीष पांडेला वगळून भारतीय संघ संजू सॅमसन किंवा नितीश राणा यांचा संघात समावेश करण्याचा विचार करू शकेल. तसेच गोलंदाजीत फिरकीपटू कृष्णप्पा गौतम आणि डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारिया यांना पदार्पणाची संधी मिळते का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

First Published on: July 22, 2021 9:33 PM
Exit mobile version