श्रीलंका दौऱ्यात कर्णधारपदासाठी शिखर धवनसोबत ‘हा’ खेळाडू शर्यतीत!

श्रीलंका दौऱ्यात कर्णधारपदासाठी शिखर धवनसोबत ‘हा’ खेळाडू शर्यतीत!

श्रीलंका दौऱ्यात कर्णधारपदासाठी शिखर धवनसोबत आणखी एक खेळाडू शर्यतीत 

भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. याच काळात, भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावरही असणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांची इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात निवड झाली आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी भारताला नव्या कर्णधाराची नेमणूक करावी लागणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून अनुभवी सलामीवीर शिखर धवनला कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्याच्यासोबत हार्दिक पांड्याही कर्णधारपदाच्या शर्यतीत असल्याचे समजते. परंतु, धवनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव असून त्याने याआधी रणजीमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात भारताचे कर्णधारपद भूषवण्यासाठी त्याचे पारडे जड आहे.

धवनचे पारडे जड

धवनने यंदा स्थगित झालेल्या आणि मागील आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. तसेच इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त धवनच्या गाठीशी सर्वाधिक अनुभव आहे. त्याने भारतासाठी मागील आठ वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे कर्णधारपदासाठी त्याचे पारडे जड आहे, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. धवनला ३४ कसोटी, १४२ एकदिवसीय आणि ६५ टी-२० अनुभव आहे.

हार्दिकचा विचार होऊ शकेल

कर्णधारपदासाठी हार्दिकचाही विचार होऊ शकेल. तो आता सातत्याने गोलंदाजी करत नाही. मात्र, तो एक मॅचविनर आहे. तो सामना एकहाती आपल्या संघाच्या दिशेने फिरवू शकतो आणि याबाबतीत त्याला भारतीय संघात कोणीही टक्कर देऊ शकत नाही. आता कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यास कदाचित त्याच्या खेळात अधिक सुधारणा होऊ शकेल, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

First Published on: May 12, 2021 9:55 PM
Exit mobile version