भारत-ऑस्ट्रेलिया ‘बॉक्सिंग डे’ कसोटी प्रेक्षकांविना नको!

भारत-ऑस्ट्रेलिया ‘बॉक्सिंग डे’ कसोटी प्रेक्षकांविना नको!

भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमधील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना प्रेक्षकांविना होता कामा नये, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी व्यक्त केले. बॉक्सिंग डे कसोटीला २६ डिसेंबरपासून सुरुवात होते. तसेच व्हिक्टोरियामध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये न होता इतर ठिकाणी घेण्याचा विचार झाला पाहिजे, असेही टेलर यांना वाटते. पर्थ आणि अॅडलेड येथे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्याने हा सामना या दोनपैकी एका ठिकाणी होऊ शकेल.

व्हिक्टोरियामधील अवस्था बिकट

बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्नमध्ये न होता, इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे का?, तर नक्कीच आहे. व्हिक्टोरियामधील अवस्था सध्या बिकट आहे. त्यामुळे ख्रिसमसच्या काळात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये केवळ १० किंवा २० हजार प्रेक्षकांनाच परवानगी मिळू शकेल. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन बलाढ्य संघांमधील कसोटी सामना इतक्या कमी प्रेक्षकांसह किंवा रिकाम्या स्टेडियममध्ये होऊ शकत नाही, असे टेलर म्हणाले.

अॅडलेडमध्ये भारताचा सामना पाहण्यासाठी गर्दी

तुम्ही हा कसोटी सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये किंवा अॅडलेड ओव्हल येथे खेळवू शकता. तिथे भरलेल्या स्टेडियममध्ये सामना होऊ शकतो. खासकरुन अॅडलेडमध्ये भारताचा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. तिथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकाच्या सामन्याची तिकिटे अवघ्या ५२ मिनिटांत संपली होती, असेही टेलर यांनी नमूद केले.

First Published on: June 29, 2020 1:30 AM
Exit mobile version