IND vs AUS : टीम इंडियासाठी ‘करो या मरो’; ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी वनडे आज

IND vs AUS : टीम इंडियासाठी ‘करो या मरो’; ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी वनडे आज

विराट कोहली

विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघ आठ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला. परंतु, भारतीय संघाचे हे पुनरागमन फारसे यशस्वी ठरले नाही. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ६६ धावांनी धूळ चारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय संघाला या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी रविवारी (आज) होणारा दुसरा एकदिवसीय सामना जिंकणे अनिवार्य आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३७४ धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारताने ३०८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने ७६ चेंडूत ९० धावांची खेळी केली, जी त्याची एकदिवसीय कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. मात्र, ही भारताला सामना जिंकवून देण्यासाठी पुरेशी नव्हती. हार्दिकच्या या खेळीनंतरही त्याच्या फलंदाजीपेक्षा, त्याच्या गोलंदाजीची अधिक चर्चा होत आहे. मागील वर्षी हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो गोलंदाजी करणे टाळत आहे. त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत एकही षटक टाकले नाही. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यातही त्याने गोलंदाजी केली नाही. तसेच गोलंदाजी करण्यासाठी मी अजून पूर्णपणे फिट नाही असे सामन्यानंतर हार्दिक म्हणाला. त्यामुळे कर्णधार कोहलीकडे सध्या सहाव्या गोलंदाजाचा पर्याय नाही.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी यांची कामगिरी फारच निराशाजनक ठरली. या दोघांनी मिळून २० षटकांमध्ये १७२ धावा खर्ची केल्या. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सैनीच्या जागी टी. नटराजन किंवा शार्दूल ठाकूर यांनी संधी मिळू शकेल. फलंदाजीत केवळ हार्दिक (९०) आणि सलामीवीर शिखर धवन (७४) यांना चांगला खेळ करता आला. मात्र, असे असतानाही भारतीय संघात फार बदल होण्याची शक्यता नाही.


सामन्याची वेळ : सकाळी ९.१० पासून

थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

First Published on: November 29, 2020 12:10 AM
Exit mobile version