IND vs ENG : इंग्लंडला धक्का; ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाज तिसऱ्या कसोटीला मुकणार

IND vs ENG : इंग्लंडला धक्का; ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाज तिसऱ्या कसोटीला मुकणार

इंग्लंडचे गोलंदाज मार्क वूड आणि जेम्स अँडरसन

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारपासून खेळला जाणार आहे. यजमान इंग्लंडला पहिल्या दोन कसोटीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडचा संघ दोन सामन्यानंतर या मालिकेत ०-१ असा पिछाडीवर आहे. कर्णधार जो रूट वगळता इंग्लंडच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यातच इंग्लंडच्या खेळाडूंचा दुखापतींनी पिच्छा पुरवला आहे. हेडिंग्ले येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना चौकार अडवण्याचा प्रयत्नात वूडच्या खांद्याला ही दुखापत झाली.

संघासोबत राहून दुखापतीवर उपचार घेणार

उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे मार्क वूड तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वूडला ही दुखापत झाली आणि बुधवारपासून हेडिंग्ले येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी तो फिट होऊ शकणार नाही. तो संघासोबत रहाणार असून दुखापतीवर उपचार घेणार आहे, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले.

दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी

वूडला कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच दुखापतींनी सतावले आहे. परंतु, असे असतानाही तो १५० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करतो. त्याने दुसऱ्या कसोटीतही चांगली गोलंदाजी केली होती. त्याने या कसोटीच्या पहिल्या डावात दोन, तर दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला त्याची उणीव भासेल. इंग्लंडला या मालिकेत जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांच्याविनाच खेळावे लागत आहे. तर दुसऱ्या कसोटीपूर्वी स्टुअर्ट ब्रॉडला दुखापत झाल्याने तो उर्वरित मालिकेला मुकणार आहे.


हेही वाचा – भारताचे पारडे जड, पण इंग्लंडला कमी लेखू नका; दिग्गज क्रिकेटपटूची ताकीद


 

First Published on: August 23, 2021 10:32 PM
Exit mobile version