IND vs ENG : वर्चस्व सिद्ध करण्याची लढाई! भारत-इंग्लंड पाचवा टी-२० सामना आज

IND vs ENG : वर्चस्व सिद्ध करण्याची लढाई! भारत-इंग्लंड पाचवा टी-२० सामना आज

सूर्यकुमार यादव आणि जॉस बटलर

भारतीय संघाने ‘करो या मरो’च्या चौथ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही संघांचे विजय मिळवत मालिकेत बाजी मारण्याचे लक्ष्य असेल. जागतिक टी-२० क्रमवारीत इंग्लंडचा संघ सध्या अव्वल, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाचवा सामना जिंकत टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. भारतीय संघ या मालिकेत आक्रमक शैलीत खेळणार असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला होता. कर्णधाराच्या म्हणण्यानुसार, भारताने या मालिकेत निडरपणे खेळ केला आहे. खासकरून भारताच्या ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या नवख्या फलंदाजांनी सर्वांना प्रभावित केले आहे.

राहुलच्या जागी ईशान?

ईशानने दुसऱ्या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात सूर्यकुमारला फलंदाजी मिळाली नाही. मात्र, चौथ्या टी-२० सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली आणि त्याने ५७ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. ईशान दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात खेळू शकला नाही. मात्र, लोकेश राहुलला धावांसाठी झुंजावे लागत असल्याने पाचव्या सामन्यात त्याच्या जागी ईशानचे संघात पुनरागमन होऊ शकेल.

अक्षर किंवा तेवातियाला संधी?

गोलंदाजीत हार्दिक पांड्याने सलग तीन सामन्यांत ४-४ षटके टाकली ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. परंतु, भारताला मागील दोन सामन्यांत सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली. त्यामुळे भारतीय संघ आता एका फलंदाजाला वगळून अक्षर पटेल आणि राहुल तेवातिया यांच्यापैकी एका अष्टपैलूला संधी देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

First Published on: March 20, 2021 2:00 AM
Exit mobile version