भारताकडून जपानचा धुव्वा

भारताकडून जपानचा धुव्वा

कार्तिक त्यागी आणि रवी बिष्णोई यांच्या भेदक मार्‍यामुळे गतविजेत्या भारताने १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या साखळी सामन्यात जपानचा १० विकेट राखून धुव्वा उडवला. भारताचा हा विश्वचषकातील सलग दुसरा विजय होता. त्यांनी पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ९० धावांनी पराभव केला होता. त्यामुळे भारताने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्यांचा अखेरचा साखळी सामना न्यूझीलंडविरुद्ध येत्या शुक्रवारी होईल.

आयसीसीच्या स्पर्धेत खेळण्याची जपानची ही पहिलीच वेळ असून त्यांच्या गाठीशी फारसा अनुभव नसल्याचे चार वेळच्या विजेत्या भारताविरुद्ध दिसून आले. या सामन्यात भारताचा कर्णधार प्रियम गर्गने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत जपानच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यामुळे त्यांचा डाव २२.५ षटकांत अवघ्या ४१ धावांत आटोपला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही, तर तब्बल पाच फलंदाज खातेही न उघडता माघारी परतले. भारताकडून वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने ३ गडी आणि लेगस्पिनर रवी बिष्णोईने ४ गडी बाद केले.

४२ धावांचे आव्हान भारताने एकही विकेट न गमावता अवघ्या ४.५ षटकांत पूर्ण केले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कुमार कुशाग्राने सुरुवातीपासूनच जपानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत भारताला विजय मिळवून दिला. यशस्वीने १८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २९, तर कुशाग्राने ११ चेंडूत २ चौकारांसह नाबाद १३ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – जपान : २२.५ षटकांत सर्वबाद ४१ (शु नोगुची ७; रवी बिष्णोई ४/५, कार्तिक त्यागी ३/१०, आकाश सिंह २/११) पराभूत वि. भारत : ४.५ षटकांत बिनबाद ४२ (यशस्वी जैस्वाल नाबाद २९, कुमार कुशाग्रा नाबाद १३).

First Published on: January 22, 2020 5:49 AM
Exit mobile version