वर्ल्डकपनंतर पोलखोल करणार !

वर्ल्डकपनंतर पोलखोल करणार !

युवराज सिंगचे वडील भडकले

भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बीसीसीआयने युवराजसारख्या खेळाडूला निवृत्त होण्यापूर्वी एक सामना खेळू द्यायला हवे होते, असे मत त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केले. त्यानंतर युवराजच्या निवृत्तीनंतर त्याचे वडील योगराज सिंग यांनी धोनीवर आपला निशाणा साधत, युवराजच्या निवृत्तीला धोनी अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असल्याची टीका केली आहे.

युवराज भारतीय संघातील राजकारणाचा बळी ठरल्याचे योगराज सिंग यांनी म्हटले आहे. युवराजच्या निवृत्तीमागे एक मोठा कट असल्याचेही योगराज यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंना योग्य पद्धतीने निरोप दिला गेला नाही. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग यांच्यासोबत जे घडले तेच आता युवराजसोबत घडले आहे. व्ही.व्ही.एस.लक्ष्मण सारख्या महान खेळाडूलाही अशाच पद्धतीने निवृत्ती स्विकारावी लागली. यासाठी केवळ एकमेव माणूस जबाबदार आहे. नाव न घेता योगराज यांनी धोनीला आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले.

मुलाखतीदरम्यान योगराज यांना तुमच्या आरोपांचा रोख धोनीकडे आहे का असा प्रश्न विचारला. मात्र योगराज यांनी सध्या विश्वचषक सुरू असल्यामुळे मी कोणाचेही नाव घेणार नाही असे म्हटले आहे. गेली १५ वर्ष तो घाणेरडे राजकारण खेळतो आहे. कित्येक खेळाडूंचे आयुष्य त्याने बरबाद केले आहे. विश्वचषक संपू द्या, या सर्व गोष्टी मी पुढे आणणार आहे. तो आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवेल,असे योगराज यांनी म्हटले आहे.

First Published on: June 16, 2019 4:09 AM
Exit mobile version