IND vs ENG 2nd ODI : कोहली पुन्हा अर्धशतक करून बाद; अखेरच्या शतकाला झाले ‘इतके’ दिवस 

IND vs ENG 2nd ODI : कोहली पुन्हा अर्धशतक करून बाद; अखेरच्या शतकाला झाले ‘इतके’ दिवस 

विराट कोहली

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी (आज) खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा फार काळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली. कोहलीने ६२ चेंडूत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील ६२ वे अर्धशतक झळकावले. तसेच हे त्याचे या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठरले. परंतु, त्याला अर्धशतकाचे शतकामध्ये रूपांतर करण्यात पुन्हा एकदा अपयश आले. ७९ चेंडूत ६६ धावांची खेळी केल्यावर कोहलीला लेगस्पिनर आदिल रशिदने बाद केले.

२२ नोव्हेंबर २०१९ मध्ये अखेरचे शतक 

कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत. मागील काही काळात तो चांगली फलंदाजी करत आहे, पण त्याला तो शतक करू शकलेला नाही. त्याने त्याचे अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक हे तब्बल ४८९ दिवसांपूर्वी केले होते. त्याने २२ नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात १३६ धावांची खेळी केली होती. हा भारताचा पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना होता. मात्र, या सामन्यानंतर कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करू शकलेला नाही.

दहा डावात ७ अर्धशतके 

कोहलीला शतक करण्यात अपयश येत असले तरी त्याने मागील १० एकदिवसीय डावांमध्ये ७ अर्धशतके केली आहे. त्याने यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ आणि ६३ धावांची खेळी होती. तर इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत त्याने शतके केली. पहिल्या सामन्यात त्याने ५६ धावांची खेळी केली, तर आजच्या सामन्यात तो ६६ धावा करून बाद झाला.

First Published on: March 26, 2021 4:48 PM
Exit mobile version