Asian Games 2018: नीरज चोप्रा फडकावणार भारताचा झेंडा

Asian Games 2018: नीरज चोप्रा फडकावणार भारताचा झेंडा

सौजन्य - डेक्कन क्रोनीकल

इंडोनेशियात पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा झेंडा फडकावण्याचा मान भालाफेकपटू नीरज चोप्रा याला मिळाला आहे. शुक्रवारी झालेल्या खेळाडूंच्या निरोप समारंभात भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नंरीदर बत्रा यांनी ही घोषणा केली आहे. इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबंग येथे १८ ऑगस्टपासून १८ व्या आशियाई खेळांना सुरूवात होणार आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत भारताकडून ५२४ खेळाडूंचे पथक रवाना झाले आहे.

नीरजकडून सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा

नीरज चोप्रा हा भारताचा एक तरूण खेळाडू असून त्याने आतापर्यंत भालाफेक या खेळात भारताकडून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एप्रिलमध्ये झालेल्या गोल्डकोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील नीरजने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यासोबतच वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई गेम्स आणि सॅवो गेम्समध्येही भारताला पदक मिळवून दिले आहे. त्यामुळे आता इंडोनेशियात पार पडणाऱ्या आशियाई खेळात नीरजकडून सुवर्णपदक पटकावण्याची अपेक्षा भारतीय चाहत्यांकडून होत आहे.

नीरज चोप्रा

भारताकडून ५२४ खेळाडूंचे पथक रवाना

१८ ऑगस्ट पासून इंडोनेशियात सुरू होणाऱ्या आशियाई गेम्ससाठी भारताकडून ५२४ खेळाडूंचे पथक रवाना होणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली. पथकात २७७ पुरुष तर २४७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. हे ५२४ खेळांडूंचे पथक ३६ वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत आपल्याला खेळताना दिसणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षीच्या भारताकडून खेळायला जाणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत घट करण्यात आली आहे. २०१४ साली दक्षिण कोरियात पार पडलेल्या आशियाई खेळांसाठी भारताने ५४१ खेळाडूंचे पथक पाठवले होते.

आशियाई गेम्स – २०१८

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ वे आशियाई गेम्स पार पडणार आहेत. आशियातील ४५ देश या स्पर्धेत सामील होणार आहेत. आशियाई गेम्सच्या इतिहासात पहिल्यादांच दोन शहरांमध्ये आशियाई गेम्सचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत नेहमी असणाऱ्या क्रीडा प्रकारांसोबतच ८ नवीन क्रीडाप्रकारांचीही भर पडणार आहे. ज्यामध्ये कराटे, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस यांच्यासारख्या नवीन खेळांची भर पडताना आपल्याला दिसणार आहे.

आशियाई खेळ, २०१८
First Published on: August 10, 2018 2:14 PM
Exit mobile version