भारतीय हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल – श्रीजेश

भारतीय हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल – श्रीजेश

भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश

आंतरराष्ट्रीय हॉकीतील १४ वर्षांच्या कारकिर्दीत भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने अनेक चढ-उतार पाहिले आहे. तो संघात आल्यापासून भारताने बरेच यश संपादन केले आहे. मात्र, त्यांना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवता आलेले नाही. भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत आठ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके पटकावली आहेत. परंतु, भारताला अखेरचे पदक हे १९८० मॉस्को ऑलिम्पिकमध्ये मिळाले होते. त्यामुळे भारतीय संघ ४० वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यास उत्सुक असून टोकियोमध्ये भारत पदक मिळवेल असा श्रीजेशला विश्वास आहे.

कोणत्याही संघावर मात करु शकतो

आता आमच्या संघात आणि इतर अव्वल संघांमध्ये फारसा फरक नाही. आम्ही कोणत्याही संघावर मात करु शकतो आणि आक्रमक खेळ करून त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करू शकतो, हे आम्ही यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या एफआयएच प्रो-लीगमध्ये दाखवले होते. टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आता आमच्याकडे एक वर्ष आहे. भारतीय हॉकीला पुढील वर्षी खूप यश मिळेल असे मला वाटत आहे. टोकियोमध्ये आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला, तर नक्कीच पदक जिंकू शकतो, असे श्रीजेशने सांगितले.

पदक जिंकण्याचे स्वप्न…

श्रीजेशने आतापर्यंत दोन ऑलिम्पिकमध्ये (२०१२ आणि २०१६) भारताचे प्रतिनिधित्व केले असून तो आता कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे त्याच्यासाठी टोकियो ऑलिम्पिकचे महत्त्व अधिक वाढले आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणे हे माझे स्वप्न आहे. मी २०१२ साली ऑलिम्पिकमध्ये खेळलो होतो आणि तो अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही, असे श्रीजेशने नमूद केले.

First Published on: July 18, 2020 1:00 AM
Exit mobile version