भारताच्या युवा फुटबॉल संघांचे भविष्य उज्वल

भारताच्या युवा फुटबॉल संघांचे भविष्य उज्वल

सौजन्य - Deccan Chronicle

भारताच्या १६ आणि २० वर्षांखालील फुटबॉल संघानी मागील काही काळात दमदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या मते भारतीय युवा फुटबॉलपटूंचे आणि ज्युनिअर संघांचे भविष्य उज्वल आहे.

भारताचा १६ वर्षांखालील संघ अप्रतिम

सुनील छेत्री युवा संघांविषयी म्हणाला, “भारताच्या १६ आणि २० वर्षांखालील संघानी मागील वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी अर्जेन्टिनासारख्या संघाचाही पराभव केला. या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे. त्यातही १६ वर्षांखालील संघ अप्रतिम खेळतो. आम्ही त्यांच्या सामन्यांचे काही व्हिडीओ पहिले. त्यांचे प्रशिक्षक त्यांना खूप चांगले प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे भविष्यात ते अजून चांगली कामगिरी करतील याचा मला विश्वास आहे.”

आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलमध्ये घडले बदल

काही दिवसांमध्ये इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या नव्या मोसमाच्या सुरूवात होत आहे. आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलमध्ये अनेक चांगले बदल होत आहेत. त्याविषयी छेत्री म्हणाला, “इंडियन सुपर लीगमुळे भारतीय फुटबॉलमध्ये खूप चांगले बदल घडत आहेत. त्यामुळे भारतीय संघ पुढे जात आहे. जर भारतीय फुटबॉलमधील सर्व घटक एकत्र आले तर भारतीय फुटबॉल खूप पुढे जाईल यात शंका नाही.”
First Published on: September 25, 2018 10:56 PM
Exit mobile version