IPL 2020 : सलामीच्या लढतीत विक्रम; तब्बल २० कोटी लोकांनी पाहिला सामना 

IPL 2020 : सलामीच्या लढतीत विक्रम; तब्बल २० कोटी लोकांनी पाहिला सामना 

रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील क्रिकेट बंद होते. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये क्रिकेटला सुरुवात झाली, पण भारतात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने क्रिकेटचे सामने होऊ शकले नाहीत. त्यामुळे भारतीय चाहते भारताच्या क्रिकेटपटूंना पुन्हा मैदानात पाहण्यास आतुर होते. अखेर आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा भारतीय क्रिकेटपटू मैदानावर दिसले. युएईमध्ये होत असलेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमाला मागील शनिवारी सुरुवात झाली. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन लोकप्रिय संघ सलामीच्या लढतीत आमनेसामने आले होते. या दोन संघांमधील हा सामना विक्रमी २० कोटी लोकांनी पाहिल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.

असे याआधी कधीही झालेले नाही

शाह यांनी ट्विटरवरून ही माहिती देताना वाहिन्यांची प्रेक्षकप्रियता ठरवणाऱ्या ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल ऑफ इंडिया’ (बार्क) या संस्थेने घेतलेल्या सर्वेचा दाखल दिला. ‘आयपीएलच्या सलामीच्या लढतीत नवा विक्रम प्रस्थापित झाला. बार्कच्या सर्वेनुसार, तब्बल २० कोटी लोकांनी हा सामना पाहिला. कोणत्याही देशातील, कोणत्याही क्रीडा स्पर्धेचा सलामीचा सामना इतक्या लोकांनी याआधी पाहिलेला नाही,’ असे शाह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले.

काय झालेले ‘त्या’ सामन्यात

अबू धाबी येथे झालेल्या सलामीच्या लढतीत चेन्नईने मुंबई इंडियन्सवर ५ विकेट राखून मात केली होती. या सामन्यात मुंबईने चेन्नईपुढे १६३ धावांचे आव्हान ठेवले होते, जे चेन्नईने ४ चेंडू राखून पूर्ण केले. त्यांच्याकडून अंबाती रायडू (७१) आणि फॅफ डू प्लेसिस (५८) यांनी चांगली फलंदाजी केली होती.

First Published on: September 22, 2020 7:17 PM
Exit mobile version