IPL 2021 : ऋतुराज, फॅफचे अर्धशतक; चेन्नईच पुन्हा ‘सुपर किंग’!

IPL 2021 : ऋतुराज, फॅफचे अर्धशतक; चेन्नईच पुन्हा ‘सुपर किंग’!

फॅफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डू प्लेसिसने केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला ७ विकेट राखून पराभूत केले. चेन्नईने यंदाच्या मोसमात उत्कृष्ट खेळ केला असून हा त्यांचा सहा सामन्यांत पाचवा विजय ठरला. दिल्लीत झालेल्या या सामन्यात हैदराबादने चेन्नईपुढे १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज आणि डू प्लेसिस यांनी १२९ धावांची भागीदारी रचली. ऋतुराजने ४४ चेंडूत ७५ धावांची, तर डू प्लेसिसने ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. अखेर या दोघांना राशिद खानने बाद केले. तसेच मोईन अलीलाही (१५) राशिदने माघारी पाठवले. मात्र, सुरेश रैना (नाबाद १७) आणि जाडेजा (नाबाद ७) यांनी उर्वरित धावा करून चेन्नईला १८.३ षटकांत विजय मिळवून दिला.

मनीष पांडेचे दमदार पुनरागमन

त्याआधी हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो (७) लवकर बाद झाला. मात्र, वॉर्नर (५७) आणि मनीष पांडे (६१) यांनी १०६ धावांची भागीदारी रचत हैदराबादला सावरले. पांडेला मागील काही सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले होते. त्याने या सामन्यात दमदार पुनरागमन केले. त्याला आणि वॉर्नरला लुंगी इंगिडीने बाद केले. परंतु, केन विल्यमसन (१० चेंडूत नाबाद २६) आणि केदार जाधव (४ चेंडूत नाबाद १२) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्याने हैदराबादने २० षटकांत ३ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली होती.

First Published on: April 28, 2021 11:26 PM
Exit mobile version