IPL 2021 : उर्वरित मोसमात खेळणार, पण कर्णधारपदाची खात्री नाही; अय्यरचं मोठं वक्तव्य

IPL 2021 : उर्वरित मोसमात खेळणार, पण कर्णधारपदाची खात्री नाही; अय्यरचं मोठं वक्तव्य

भारताचा फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला मुकावे लागले होते. आयपीएल स्पर्धेपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. परंतु, आयपीएलचा यंदाचा मोसम मे महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. आता उर्वरित मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत होणार आहे. या उर्वरित मोसमात खेळण्यासाठी श्रेयस सज्ज झाला आहे. परंतु, श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदा रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्यामुळे श्रेयसचे पुनरागमन झाल्यावर कोण दिल्लीचे नेतृत्व करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कर्णधारपदाचा निर्णय माझ्या हातात नसल्याचे श्रेयस म्हणाला.

निर्णय संघमालकांच्या हातात

खांद्याला झालेल्या दुखापतीतून आता मी सावरलो आहे. आता एक अखेरचा टप्पा बाकी असून त्याला महिन्याभराचा कालावधी लागले. परंतु, मी सरावाला सुरुवात केली आहे. मी आयपीएलच्या उर्वरित मोसमात खेळणार आहे, पण कर्णधारपदाची मला खात्री नाही. तो निर्णय संघमालकांच्या हातात आहे. माझ्या अनुपस्थितीतही आमचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी होता आणि मी केवळ या गोष्टीला महत्त्व देतो. दिल्लीला आयपीएलचे जेतेपद पटकावण्यास मदत करणे हे माझे लक्ष्य आहे, असे श्रेयस म्हणाला.

दिल्ली कॅपिटल्सची चांगली कामगिरी 

श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने मागील काही वर्षांत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्लीने बऱ्याच काळानंतर प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता. तर मागील मोसमात दिल्लीच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अंतिम फेरीत त्यांना मुंबई इंडियन्सने पराभूत केले. यंदा श्रेयसच्या अनुपस्थितीतही दिल्लीने चांगला खेळ सुरु ठेवला. यंदा पंतच्या नेतृत्वात खेळताना दिल्लीने ८ पैकी ६ सामने जिंकले होते.


IPL : पुढील आयपीएल मोसमापूर्वी ‘मेगा लिलाव’; संघांना केवळ चार खेळाडू करता येणार रिटेन


 

First Published on: July 5, 2021 4:24 PM
Exit mobile version