IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्स संघाच्या तीन सदस्यांना कोरोना; पुढील सामना मात्र होणार

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्स संघाच्या तीन सदस्यांना कोरोना; पुढील सामना मात्र होणार

चेन्नई सुपर किंग्स संघाच्या तीन सदस्यांना कोरोना

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेवर सध्या कोरोनाचे सावट आहे. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य बायो-बबलमध्ये राहत असल्याने ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा बीसीसीआयचा समज होता. मात्र, सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या दोन खेळाडूंना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोलकाता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमधील सामना पुढे ढकलणे बीसीसीआयला भाग पडले आहे. त्यापाठोपाठ आता चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाच्या तीन सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. परंतु, यामध्ये खेळाडूंचा समावेश नसल्याने चेन्नईचा पुढील सामना ठरल्याप्रमाणेच होण्याची शक्यता आहे.

१० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार

चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. रविवारी संपूर्ण संघाची कोरोना चाचणी झाली असून या तिघांव्यतिरिक्त सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, या रिपोर्टमध्ये काही चूक असल्याची साशंकता नको या कारणाने विश्वनाथन, बालाजी आणि सफाई कर्मचाऱ्याची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आता या चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्यास त्यांना १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल.

खेळाडूंचा समावेश नाही 

कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये खेळाडूंचा समावेश नसल्याने चेन्नईचा पुढील सामना ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे समजते. चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ५ मे रोजी (बुधवार) दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर सामना होणार आहे. मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतही चेन्नईच्या काही सदस्यांना आणि खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती.

First Published on: May 3, 2021 3:40 PM
Exit mobile version