IPL : पाकचा क्रिकेटपटू म्हणतो…पाकिस्तान सुपर लीगची तुलना आयपीएलसोबत होऊच शकत नाही!

IPL : पाकचा क्रिकेटपटू म्हणतो…पाकिस्तान सुपर लीगची तुलना आयपीएलसोबत होऊच शकत नाही!

पाकिस्तानचे खेळाडू शादाब खान, वहाब रियाझ आणि मोहम्मद हाफिज

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा मानली जाते. त्यामुळे सर्वच देशांचे आघाडीचे क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. भारताच्या नवख्या क्रिकेटपटूंना या उत्कृष्ट खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळते. तसेच हे युवा खेळाडूही दमदार कामगिरी करत असल्याने या स्पर्धेचे बहुतांश सामने चुरशीचे होतात. त्यामुळे आयपीएल दर्जा वेगळा असून या स्पर्धेशी जगातील इतर कोणत्याही स्पर्धेची तुलना करणे अशक्यच असल्याचे मत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझने व्यक्त केले. तसेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) सर्व देशांचे आघाडीचे खेळाडू खेळत नसल्याने या स्पर्धेचीही आयपीएलसोबत तुलना होऊ शकत नाही, असे वहाब म्हणाला.

आयपीएलचा दर्जा वेगळा

आयपीएल स्पर्धेत जगभरातील आघाडीचे खेळाडू खेळतात. त्यामुळे तुम्ही आयपीएल आणि पीएसएलमध्ये तुलना करू शकत नाही. आयपीएल स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. आयपीएलमध्ये ज्याप्रकारे खेळाडूंची निवड होते, खेळाडूंशी ज्याप्रकारे संवाद साधला जातो, खेळाडूंची या स्पर्धेशी बांधिलकी ही पूर्णपणे वेगळीच आहे. त्यामुळे इतर कोणत्याही टी-२० स्पर्धेची आयपीएलसोबत तुलना होऊ शकत नाही, असे वहाबने क्रिकेट पाकिस्तानच्या युट्युब चॅनलशी बोलताना सांगितले.

पीएसएलमधील गोलंदाज सर्वोत्तम

आयपीएल ही जगातील सर्वोत्तम टी-२० स्पर्धा आहे. त्याखालोखाल पाकिस्तान सुपर लीग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीएसएलमध्ये खासकरून गोलंदाजांचा दर्जा फार वरचा आहे. पीएसएल स्पर्धेत ज्याप्रकारे प्रतिभावान गोलंदाज पुढे येतात, ते आयपीएलमध्येही येत नाहीत. पीएसएलमधील सर्व संघांची गोलंदाजांची फळी ही जगात सर्वोत्तम असल्याचे वहाब म्हणाला.
First Published on: May 15, 2021 8:39 PM
Exit mobile version