WTC Final : न्यूझीलंडला टेंशन! केन विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार

WTC Final : न्यूझीलंडला टेंशन! केन विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पुढील शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. परंतु, त्याआधी न्यूझीलंडच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या डाव्या कोपराला दुखापत झाली असून तो इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे गुरुवारपासून (उद्या) खेळला जाणार आहे. या सामन्यात विल्यमसन खेळू शकणार नाही. परंतु, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी तो फिट होईल अशी न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाला आशा आहे.

डाव्या कोपराला त्रास जाणवतोय   

कसोटी सामन्याला मुकण्याचा निर्णय घेणे विल्यमसनसाठी सोपे नव्हते. परंतु, हाच योग्य निर्णय आहे. फलंदाजी करताना त्याच्या डाव्या कोपराला त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला इंजेक्शन देण्यात आले असून विश्रांती घेतल्यास त्याचा त्रास कमी होऊ शकेल, असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले.

लेथम करणार नेतृत्व 

विल्यमसन सध्या जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे तो लवकरच पूर्णपणे फिट होईल अशी न्यूझीलंडला आशा आहे. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्याच्या अनुपस्थितीत सलामीवीर टॉम लेथम न्यूझीलंडचे नेतृत्व करेल. तसेच युवा फलंदाज विल यंग तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. विल्यमसनप्रमाणेच डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही.

First Published on: June 9, 2021 9:09 PM
Exit mobile version