खेळाच्या मैदानातील ध्येयवेडा ‘सांख्यिकीकार’

खेळाच्या मैदानातील ध्येयवेडा ‘सांख्यिकीकार’

रमेश वरळीकर

मैदानावरील खेळ. त्या खेळाचे सातत्य आणि त्यांच्या स्पर्धांतील रेकॉर्ड जतन केले गेले की खेळाडूत स्पर्धात्मक खेळाची सवय जडत जाते. खेळाचे महत्त्व वाढत जाऊन खेळ वाढत जातो. खेळ जनमानसात रुजण्याचा सांख्यिकी हा महत्त्वाचा भाग आहे. दुर्दैवाने देशी खेळ हे फक्त खेळले जातात. त्यांची गुणात्मक नोंद फारशी झाली नाही. परिणामी, आटापाट्यांसारखा खेळ कालबाह्य झाला. कबड्डीचे हजारो संघ असूनही ‘सांख्यिकी’ रुजविण्याचा कुणी जोमाने प्रयत्न केला नाही. खो-खो खेळात सांख्यिकी ठेवण्याचा सातत्याचा प्रयत्न केला तो रमेश वरळीकर या ध्येयवेड्या क्रीडा कार्यकर्त्याने.

मैदानाची ओढ खेळाडूंना, क्रीडा कार्यकर्त्यांना शांत बसू देत नाही. तारुण्यातील खेळाचा जोश ओसरू लागला की मैदानाच्या ओढीने पंच, प्रशिक्षक, संघटक असा टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू होतो. रमेश वरळीकरांच्या बाबतीत असेच घडत गेले. 1950 पासून ते खो-खो खेळाशी अखंडितपणे संबंधित होते. 1950 ते 60 या दशकात खेळाडू म्हणून त्यांचा मैदानाशी संबंध आला. त्यानंतर प्रशिक्षक, पंच, संघटक असा प्रवास करत करत त्यांनी खो-खो खेळाची सांख्यिकी सेवा सुरू केली. रचनात्मक पद्धतीच्या कार्यपद्धतीवर भर असलेल्या वरळीकरांना सांख्यिकीकडे आकृष्ट केले ते क्रिकेट समालोचक विजय मर्चंट यांच्या कॉमेन्ट्रीने व त्यांना माहिती उपलब्ध करुन देणार्‍या आनंदजी डोसा यांनी.

क्रिकेटचे समालोचन खेळाडूंचे रेकॉर्ड कथन केल्याने प्रभावी होतोच, पण त्याच्या नोंदी जतन केल्याने खेळाचीही उंची वाढते. खेळाडूचे कसब क्रीडाप्रेमींसमोर उभे करता येते. याच विचाराने रमेश वरळीकर झपाटले गेले आणि खो-खोची सांख्यिकी करण्यास त्यांनी प्रारंभ केला. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तराच्या काही खो-खो स्पर्धांतून पंचगिरीचा प्रचंड अनुभव त्यांच्या पदरी होता. 1965-66, 1966-67 या अ.भा.भाई नेरुरकर स्मृती चषकाच्या खो-खो स्पर्धेतील अंतिम सामन्यातून पंचगिरी केल्यानंतर राज्य खो-खो संघटनेच्या तत्कालीन ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी त्यांना खो-खो पंचगिरीबद्दल ‘स्टेट ऑनर’ देण्याचे ठरवले, पण त्याकरिता वरळीकरांनी राज्यस्तरीय पंचपरीक्षा द्यावी अशी अट घातली गेली. या निर्णयाला झुगारून त्यांनी शिट्टी कायमची म्यान केली आणि ‘सांख्यिकी’ला वाहून घेतले.

सांख्यिकीसंबंधी व्याख्यान देणे, मार्गदर्शन करणे, अभ्यासक्रम तयार करून सांख्यिकी परीक्षा घेणे याबाबींबाबत मोठ्या आवडीने आणि क्षमतेने ते काम करू लागले. सांख्यिकीचे काम खरेतर एका व्यक्तीचे नसून अनेक कार्यक्षम कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन करायचे काम आहे. महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तत्कालीन पदाधिकार्‍यांनी सांख्यिकीची कल्पना उचलून धरली व वरळीकरांना प्रोत्साहन दिले. परिणामी, या उपक्रमाचे भारतभर स्वागत झाले. सांख्यिकीच्या सातत्यामुळे या यंत्रणेने उंची गाठली. पुढे ही यंत्रणा 1995 पर्यंत खो-खोमध्ये उत्तमपणे कार्यरत होती. मात्र, पुढे पुढे दुर्दैवाने ज्यांच्या हातात सूत्र गेली त्यांनी स्वारस्य दाखवले नाही, अशी खंत वरळीकरांनी व्यक्त केली होती. त्यांच्याकडे खो-खोची 31 मार्च 2015 पर्यंत माहिती उपलब्ध होती. ती त्यांनी पद्धतीशीर जतन केलेली होती.

वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतरही वरळीकर निश्चयाने आणि नेटाने काम करत होते. एका अपघाताने हातात काठी आली असली तरी बुद्धिमत्तेच्या बळावर कामाचा वेग आणि सातत्य कायम होते. मात्र, उतारवयाकडे झुकताना कुणीतरी पुढे येऊन या सांख्यिकी कामाचे सातत्य पुढे सुरू ठेवावे, अशी त्यांची इच्छा होती. ज्यांना अशा कामात स्वारस्य असेल त्यांना मार्गदर्शन करण्याची वरळीकरांची तयारी होती. 1 मे 2015 रोजी प्रदीर्घ काळाच्या खो-खो सांख्यिकीला या क्रीडा क्षेत्रातल्या मैदानावरच्या ध्येयवेड्या बुजुर्ग कार्यकर्त्याने ‘अलविदा’ केला होता.

मुळात या ध्येयवेड्या क्रीडा कार्यकर्त्याचा पिंड घडला तो मैदानाला महत्त्व देणार्‍या ‘लोकसेना’ या संघटनेत. या संघटनेची स्थापना 1941 ची. आचार्य अत्रे, तात्या सुळे, अनंत काणेकर, लालजी पेंडसे, मनोहर कोतवाल, पडवळ गुरुजी हे या संघटनेचे संस्थापक. त्यांच्या वैचारिक बैठकीत त्या काळात जे तरुण घडले, त्यातील वरळीकर एक. बौद्धिक कार्याबरोबरच मैदानी खेळांचा पुरस्कार संघटनेने केला आणि विचाराबरोबर खेळाडू घडवण्याचा वसा वरळीकरांनी घेतला. स्वातंत्र्यानंतरही काही शिबिरे, क्रीडा स्पर्धा यात लोकसेना अग्रणी होती. पुढे पुढे मात्र काही संघटनांवर बंदी आली. इथेच लोकसेना थांबली. मात्र, वरळीकरांनी खेळ व मैदानाच्या ध्यासाने नवनवीन वाटा शोधून काढल्या आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कामाचा ठसा उमटवला.

अमर हिंद मंडळाचे विश्वस्त राहिलेल्या वरळीकरांनी 1) प्रारंभीपासूनचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे वार्षिक अहवाल, 2) अ.भा.भाई नेरुरकर स्पर्धेच्या स्मरणिका, 3) खो-खो नियम पुस्तिका, 4) 1960 पासूनची खो-खो कात्रणे, 5) देशी खेळासंबंधीचे लेख, 6) खेळासंबंधीची असंख्य महत्त्वाची माहिती जतन करुन ठेवली होती. कुणी खेळातली ओढ असलेल्या युवा क्रीडाप्रेमींचे पाय इथे वळतील का, या प्रतीक्षेत वरळीकर मैदानात नजर ठेवून होते.

-(लेखक – भास्कर सावंत)

First Published on: May 8, 2020 5:29 AM
Exit mobile version