IPL 2020 : यंदाच्या स्पर्धेत दमदार कामगिरीचा विश्वास – हार्दिक पांड्या

IPL 2020 : यंदाच्या स्पर्धेत दमदार कामगिरीचा विश्वास – हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या

भारत आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पांड्याला मागील वर्षीच्या अखेरीस पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्याला काही काळ मैदानाबाहेर रहावे लागले होते. मार्चमध्ये झालेल्या डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेतून त्याने मैदानात पुनरागमन केले. त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, कोरोनामुळे हार्दिकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबणीवर पडले. मात्र, आता तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. त्याला या स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचा विश्वास आहे.

खेळपट्टीवर थोडा वेळ घालवावा लागेल

मी सध्या ज्याप्रकारे चेंडू फटकावत आहे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी जितका फिट आहे, ते पाहता, यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरीचा मला विश्वास आहे. आता फक्त मला खेळपट्टीवर थोडा वेळ घालवावा लागेल आणि त्यानंतर मी सहजतेने धावा करू शकेन असे मला वाटते. क्रिकेटपासून मी कितीही काळ दूर असलो, कितीही काळ मला क्रिकेट खेळता आले नसले, तरी मैदानात परतल्यावर मला पूर्वीइतकाच आनंद मिळतो. यंदाच्या मोसमासाठी मी चांगली तयारी केली आहे. यंदाच्या स्पर्धेत मला आणि संघाला यश मिळेल अशी आशा आहे, असे हार्दिकने सांगितले.

दुखापती होणारच आहेत

आयपीएलमध्ये खेळताना मला नेहमीच खूप मजा येते. या स्पर्धेच्या माध्यमातून दमदार पुनरागमन करण्याचा माझा प्रयत्न असेल. मी आता ही स्पर्धा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचेही हार्दिक मुंबई इंडियन्स संघाने ट्विटरवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला. तसेच त्याने दुखापतीविषयी सांगितले की, मला आता एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे मी जोपर्यंत खेळत आहे, तोपर्यंत मला दुखापती होणारच आहेत. दुखापती या खेळाचा भागच आहेत.

First Published on: September 16, 2020 8:05 PM
Exit mobile version